
खेळ म्हणजे केवळ क्रीडाप्रकार नव्हे, तर आयुष्यच : जलतरणपटू मनोज एरंडे
बाराव्या डेरवण युथ गेम्सचा समारोप

चिपळूण : ‘खेळ हा केवळ क्रीडाप्रकार नाही, तर ते आयुष्य आहे. एक उत्तम माणूस म्हणून घडण्यासाठी जे लागते ते खेळ तुम्हाला देऊ शकतो. आजच्या मोबाइलच्या जमान्यात तुम्ही जर आवर्जून एखादा खेळ खेळत असाल तर त्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही’, असे उद्गार शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध जलतरणपटू मनोज एरंडे यांनी काढले. बाराव्या ‘डेरवण यूथ गेम्स २०२६’चा समारोप सोहळा एसव्हीजेसीटी क्रीडासंकुलात नुकताच पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून एरंडे बोलत होते.
शिवजयंतीनिमित्त आठवडाभर आयोजित करण्यात आलेल्या ‘डेरवण युथ गेम्स’ या राज्यस्तरीय क्रीडामहोत्सवाचा नुकताच समारोप झाला. यावेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ. दीपक माने, एसव्हीजेसीटीचे विश्वस्त विकास वालावलकर, डॉ. सुवर्णा पाटील, शरयू यशवंतराव, श्रीकांत पराडकर, अजित गाळवणकर, संदीप तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘स्वप्न, समर्पण, निश्चय आणि निष्ठा या बाबी तुमच्याकडे असतील तर आयुष्यात तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हाल’, असे मार्गदर्शन एरंडे यांनी खेळाडूंना केले.
एसव्हीजेसीटीतर्फे गेली बारा वर्षे सुरू असलेल्या क्रीडा उपक्रमाचे डॉ. दीपक माने यांनी कौतुक केले. ‘येत्या १० वर्षांत भारत हे जगातील सर्वात मोठे क्रीडा केंद्र असेल. देशात क्रीडाविषयक अनेक व्यासपीठे निर्माण होणार आहेत. क्रीडा क्षेत्राकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले जाते याचा आनंद आहे’, असे डॉ. माने आपल्या भाषणात म्हणाले.
क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी यंदा पार पडलेल्या डेरवण यूथ गेम्सचा आढावा घेतला. डीवायजीमध्ये यावर्षी १९ विविध क्रीडा प्रकारांमध्ये ६,८०० खेळाडूंनी भाग घेतला. विजेत्या खेळाडूंना ११५ चषक, १,१६० पदके आणि १६ लाख रुपयांहून अधिक रकमेची पारितोषिके देण्यात आली. ८ हजारांहून अधिक क्रीडा रसिकांनी उपस्थिती दर्शवली. खो-खो खेळात ७२ तर कबड्डी खेळात ६९ संघ सहभागी झाले होते. तर यंदा पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेल्या स्केटिंगमध्ये ९० स्पर्धकांनी भाग घेतला. अथलेटिक्समधील १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकाराच्या अंतिम फेऱ्या यावेळी पार पडल्या. त्यातील विजेत्यांना प्रमुख पाहुणे आणि एसव्हीजेसीटीचे प्रमुख विश्वस्त वालावलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अथलेटिक्स १०० मीटर धावणे क्रीडाप्रकारातील सुवर्णपदक विजेत्यांची नावे
मुली – शर्वरी निकम (कोल्हापूर), ध्रुविका पवार, (छ. संभाजीनगर), अना (ठाणे), कनन देसाई, (ठाणे)
मुले – राजवीर कचरे (सातारा), स्नेह कामेरकर, (ठाणे), सक्षम चव्हाण (ठाणे), मानस शिंदे (ठाणे).
मल्लखांब सांघिक मध्ये २७ संघ तर वैयक्तिक प्रकारात ३३७ जणांचा सहभाग
डेरवण युथ गेम्स, अर्थात ‘डीवायजी २६’मध्ये पार पडलेल्या मल्लखांब स्पर्धेत साताराच्या मल्लखांबपट्टूनीं वर्चस्व गाजवले. यामध्ये साताऱ्याच्या महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या आयुष काळगे याला मुलांमधून उत्कृष्ट मल्लखांबपट्टू तर मुलींमधून वैष्णवी पवार हिला उत्कृष्ट मल्लखांबपट्टू म्हणून गौरविण्यात आले.
या स्पर्धेत सांघिक प्रकारात साताऱ्याच्या आठ संघानी पारितोषिके पटकावली. तर त्याखालोखाल पुणे ५, सांगली ४, रत्नागिरी ३, सोलापूर १, पालघर १, मुंबई ३, नाशिक १, रायगड १ येथील संघांनी पारितोषिके मिळवली आहेत.




