
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी
रत्नागिरी : येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दरवर्षी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जयस्तंभ ते मारुती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक तथा शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत मराठा बंधू-भगिनी पारंपरिक वेषभूषेत सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीयेला झाला. यंदा तृतीय ६ मार्च रोजी होती. त्यानुसार सायंकाळी उशिरा शोभायात्रेला जयस्तंभ येथून सुरवात होऊन मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगता झाली. प्रथेप्रमाणे सायंकाळी शहराजवळील रत्नदुर्ग किल्ल्यावरील देवी भगवती मंदिर येथून शिवज्योतीचे प्रस्थान झाले. त्यानंतर सायंकाळी जयस्तंभ येथे आगमन झाल्यानंतर छत्रपती महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
शोभायात्रेत विविध ढोल, ताशे, झांजपथक, मर्दानी खेळ आणि महाराजांच्या जीवनावरील चित्ररथांचा समावेश होता. यावेळी क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, मंडळाचे पदाधिकारी राकेश नलावडे, प्रदीप साळवी, प्राची शिंदे यांच्यासह नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.




