
शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर,मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची केली घोषणा,
राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. ६) महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विद्यमान मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केल्याची नोंद झाली.यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी केली होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः अर्थसंकल्प मांडला. शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला असून २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्याचा कृषी जीडीपी सध्या ५५ अब्ज डॉलर असून तो २०४७ पर्यंत ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून १० ते १५ ठिकाणी एकत्रित मूल्यसाखळी (व्हॅल्यू चेन) उभारण्याची योजना राबविण्यात येणार आहे. सध्या ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान व बाजारभावाची माहिती देण्यात येत आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सुरू करण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच केंद्र सरकारच्या एग्रीस्टॅक योजनेअंतर्गत राज्यात फेब्रुवारीपर्यंत १ कोटी ३१ लाख ‘फार्मर आयडी’ तयार करण्यात आले आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पुढील चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. महिला गोपालक व शेळीपालकांसाठीही विशेष योजना राबविण्याची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, अर्थव्यवस्थेचा आकार १२३ अब्ज डॉलरवरून १५०० अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचा उद्देश असून महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचा निर्धारही फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई-पुणे जलदगती रेल्वे प्रकल्पासाठी तरतूद केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी आभार मानले.




