
जिल्हा शासकीय रुग्णालयातील समस्यांवर ठाकरे शिवसेनेचा संताप; प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वाढत्या गैरसोयी, अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयातील विविध समस्यांबाबत शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना मंगळवारी (२७ मे) निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे रुग्णालयातील सर्व समस्या पुढील आठ दिवसांत सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेने प्रशासनाला दिला आहे.
यावेळी उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, नगरसेवक केतन शेट्ये, अमित विलणकर यांच्यासह विभागप्रमुख राजाराम रहाटे, संदेश भिसे, रोहित मयेकर, तन्वीर मुजावर, दिलावर गोदड, सुफियान जयगडकर, प्रसन्न सुर्वे, रोहन वारेकर, मंदार, अमन राणे, गौरव कळंबटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णालयात सध्या एक्स-रे फिल्मचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना बाहेरून महागड्या दराने एक्स-रे काढावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली. तसेच रुग्णालयातील स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था असून दुर्गंधीमुळे रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आपत्कालीन आणि अपघात विभागातील अपुऱ्या सुविधा, गंभीर रुग्णांवरील उपचारांमध्ये होणारा विलंब, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांऐवजी कंत्राटी वॉर्ड बॉयवर असलेले अवलंबित्व यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा आरोपही करण्यात आला. याशिवाय रुग्णालय परिसरात वाहनतळाची शिस्तबद्ध व्यवस्था नसल्याने रुग्णवाहिकांनाही अडथळे निर्माण होत असल्याची बाब समोर आणण्यात आली.
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर समस्यांवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.




