विमान प्रवासापेक्षाही महागडी रो-रो,सहा तासांत कोकणात पोहोचण्याची सोय; पण दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर!


रो-रो बोट सेवा कोकण विकासाचे तांत्रिक दृष्ट्या नवे पाऊल ठरले असले तरी ही सेवा कोकणवासीयांच्या खिशाला परवडणारी नसल्याने त्यांच्या आर्थिक गणिता पलिकडची ठरली आहे.

विमान प्रवासापेक्षाही महागडी रो-रो

रो-रो बोट सेवेचे किमान तिकीट 3000 रुपये असून ते 9000 रुपयांपर्यंत जाते. जर कोकणातील माणूस आपल्या पाच जणांच्या कुटुंबासह कोकणात जायचे ठरवेल, त्यावेळी त्याला एकवेळचे किमान 15 हजार रुपये तर येता-जाता दोन्ही वेळचे एकूण 30 हजार रुपये प्रवास भाडे रो-रो सेवेला द्यावे लागणार आहेत. हे रो-रो प्रवासभाडे कोकणातील मध्यमवर्गीय कुटूंबाकरिता केवळ अशक्य आहे. मुंबई-विजयदुर्ग एसटी बसचे तिकीट 860 रुपये आहे, म्हणजे पाच माणसांच्या कुटूंबाकरीता हे भाडे 4 हजार 300 रुपये होते, जाता येता हे भाडे 8 हजार 600 रुपये होते, जे कोकणवासीयांनी परवडते, शिवाय एसटी बस थेट आपल्या गावांत पोहोचते. मुंबई-विजयदुर्ग खासगी प्रवासी बसचे भाडे 1200 रुपये माणशी आहे. खासगी कारने मुंबई-विजयदुर्ग प्रवास केला तर जावून येवून हा प्रवास खर्च 8 ते 10 हजार रुपये होतो. दरम्यान मुंबई ते चिपी (सिंधुदूर्ग) विमानाचे तिकीट 5800 रुपये आहे, आणि हे तिकीट दोन महिने वा तिन महिने आगाऊ बुकींग केले तर ते आणखी कमी येते. मुंबई-विजयदुर्ग प्रवासाच्या रो-रो व्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या प्रवासी सुविधांच्या तूलनेत रो-रो सेवेचे तिकीट कोकणवासीयांना परवडणारे नसल्याने ही रो-रो सेवा केवळ श्रीमंत पर्यटक आणि सुखवस्तू वर्गासाठी आहे, अशीच भावना कोकणवासीयांनी व्यक्त केली आहे.

महिनाभराचा पगार एका फेरीचा खर्च

सागरी प्रवास हा सर्वात स्वस्त प्रवासी मार्ग मानला जातो. केंद्र सरकारचे धोरण देखील सागरी मार्गांना प्रोत्साहन देण्याचेच आहे. सर्वाधीक मालवाहतूक सागरी मार्गानेच होते कारण हा प्रवासी मार्ग स्वस्त आहे. परंतू देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबईनगरी, कोकणातील ज्या माणसांनी उभी केली, त्याच कोकणातील माणसाला आपल्या गावी जाणाऱ्या रो-रो सेवेचा केवळ आर्थिक दृष्ट्या परवडत नाही म्हणून लाभ घेता येत नाही, या परिस्थितीचा विचार शासनाने करणे अनिवार्य आहे. कोकणची ही रो-रो सेवा सामान्यांपर्यंत पोहोचवायची असेल, तर सरकारने त्यात सवलत देणे किंवा दरांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गोवा महामार्गाने. 10-12 तास बसने प्रवास करणाऱ्या कोकणातील माणसाला सागरी मार्गाने 6 तासांत कोकणात पोहोचण्याची इच्छा नक्कीच आहे, पण त्यासाठी तो आपल्या महिनाभराचा पगार एका फेरीवर खर्च करू शकत नाही, हे वास्तव शासनाने लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.

गरिबाच्या सायकलला देखील 600 रुपये तर मोटरसायकलला 1000 रुपये

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेत दुचाकीसाठी 1000 रुपये आणि चारचाकीसाठी 6000 ते 9000 रुपये मोजावे लागणार आहेत. गोवा महामार्गावरील टोल आणि इंधनाचा खर्च यापेक्षा हा जलप्रवास कितीतरी पटीने महाग आहे. सायकलीसाठी देखील 600 रुपये दर आहे. पर्यावरणस्नेही आणि गरिबांचे वाहन असलेल्या सायकला देखील या दरातून सवलत सवलत नाही. निसर्ग रमणीय कोकणात तरुण व पर्यटक सायकल आणि मोटरसायकल मोहिमेसाठी सातत्याने येतात, मात्र त्यांनाही हा दर परवडणारा नाही, अशी प्रतिक्रीया निसर्गभ्रणण मोहीमा आयोजनात व्यस्त युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे राज्य कार्यवाह रमेश किणी यांनी दिली आहे.

छोट्या पर्यटन व्यावसायिकांना लाभ कितपत होणार ?

विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला या रो-रो सेवेमुळे चालना मिळेल असा दावा शासनाकडून केला जात आहे. परंतू प्रत्यक्षात ही मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा दर बुधवारी आणि शनिवारी तर विजयदुर्ग ते मुंबई दर गुरुवारी आणि रविवारी अशी आठवड्यातून मर्यादित दिवसांकरिता सद्यस्थितीत राहाणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. रो-रो सेवेचे आजचे तिकीट दर पाहाता उच्च आर्थिक गटातील पर्यटक येतून येतील. हे पर्यटक स्थानिक होम-स्टे किंवा छोट्या खानावळींपेक्षा मोठ्या रिसॉर्ट्सना पसंती देतात. त्यामुळे स्थानिक छोट्या पर्यटन व्यावसायिकांना त्यांचा कितपत लाभ होईल असा प्रश्न पर्यटन व्यावसायिकांचाच आहे. कोकणातील छोट्या हॉटेल व्यावसायिकांना उत्पन्न मिळण्यासाठी सर्वसामान्य पर्यटकांचे वाढणे आवश्यक आहे, मात्र असा विचार रो-रो सेवा सुरु करण्यापूर्वी केला गेलेला नाही असे निरिक्षण कोकणातील पर्यटन व्यावसायिक राजेंद्र पारकर यांनी नोंदविले आहे.

शासनाने रो-रोच्या तिकीट दरांचा पुनर्विचार करणे अनिवार्य

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा ही तांत्रिक विकासाचे पाऊल असेले तरी ही सेवा कोकणातील सर्वसामान्यांच्या आर्थिक गणितीच्या पलिकडचीच आहे.शासनाने रो-रोच्या तिकीट दरांचा पुनर्विचार करणे अनिवार्य आहे. कोकणवासीयांची महत्वाची गरज म्हणून सामान्य कोकणी माणसाला परवडेल असे दर ठेवले तरच कोकणवासीयांना दाखवलेले हे स्वप्न वास्तवात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button