कोकण-कोल्हापूर मंडळात कॉपीमुक्तीचा राजमार्ग

वार्षिक नियोजनासह प्रतिबंधात्मक उपायांची कडक अंमलबजावणी.

वर्षीही राज्यभरात अन्यत्र कॉपीचे शेकडो गैरप्रकार निदर्शनास येत असतानाच कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळात तुलनेने कमालीची शांतता आहे. यंदाच्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे अर्धे अधिक पेपर संपले असताना सांगली जिल्ह्यातील एकमेव गैरप्रकार वगळता कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळात एकही गैरप्रकार निदर्शनास आलेला नाही. मागील दीड वर्षातील कोल्हापूर विभागीय मंडळाने शाळा पालक आणि परीक्षार्थी यांची मानसिकता बदलण्याबरोबरच योजलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपायांनी हे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.

बोर्डाची 10 फेब्रुवारी पासून बारावीची,तर 20 फेब्रुवारीपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू आहे. ती 18 मार्चपर्यंत चालणार आहे.
बारावी शास्त्र शाखेचे मुख्य पेपर संपले असून तुरळक बाकी आहेत, कला वाणिज्य आणि एमसीव्हिसी शाखांची लेखी परीक्षा 11 मार्च अखेर संपेल. त्यानंतर कला वाणिज्य आणि शास्त्र शाखांमधील वैकल्पिक असलेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयाची ऑनलाइन परीक्षा 12 ते 14 मार्च या कालावधीत तर सामान्य ज्ञान (जीके) विषयाची ऑनलाईन परीक्षा 16 ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे.

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळात ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ ही अभिनव वार्षिक नियोजन पुस्तिका शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी चालू शैक्षणिक वर्षात तयार करण्यात आली आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यातून प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजात शिस्तबद्धता आली. त्यास अनुसरून राबविलेल्या विविध परीक्षापूरक उपक्रमांमुळे सर्व समावेशक जागृती झाली.
परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही अनिवार्यते बरोबरच संवेदनशील केंद्रावर व्हिडिओ शूटिंग, ड्रोन द्वारे निगराणी, भरारी व बैठकी पथके, सांगली जिल्ह्यात झूमद्वारे प्रत्येक वर्ग खोलीत निगराणी, प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत स्वतंत्रपणे व्हिडिओ द्वारे जागृती, विषयनिहाय व्हिडिओ निर्मिती यामुळे इतर विभागीय मंडळाच्या तुलनेत कोकण व कोल्हापुरात कधी नव्हे एवढी परीक्षा शांततेत सुरू आहे.
सर्व जिल्ह्यातून कानोसा घेतला असता याबाबत मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. विभागीय मंडळांने परीक्षा आयोजनातील प्रत्येक बाबीवर सूक्ष्म नियोजन केल्याचे दिसून येते. त्याच जोडीला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समिती यांचे कामही उठावदार असून विभागीय मंडळ आणि दक्षता समिती उत्तम समन्वय असल्याचेही निदर्शनास येते.

“परीक्षा काळातील सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही गैरप्रकाराची गय केली जाणार नाही,याची जाणीव क्षेत्रीय यंत्रणा, परीक्षा आयोजनातील सर्व घटक तसेच परीक्षार्थींना करून देण्यात आलेली आहे.
-राजेश क्षीरसागर,
विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button