
धाऊलवल्ली प्रवासी जेटीवर बेदरकार मच्छी वाहतूक
अप्रशिक्षित चालकांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका
राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली येथील प्रवासी जेटीवर सध्या गंभीर प्रकार उघडकीस येत असून बर्फ, पाणी व मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे परिसरातील नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. विशेषतः काही वाहनमालकांकडून अप्रशिक्षित परप्रांतीय चालकांकडे वाहने चालवण्याची जबाबदारी दिली जात असल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे.
धावलवल्ली येथील ही जेटी मूळतः प्रवासी वाहतुकीसाठी असून यापूर्वी बंदर विभागाकडून येथे मत्स्य व्यवसायाच्या होड्या किंवा बोटी लावू नयेत असा स्पष्ट फलक लावण्यात आला होता. मात्र सदर फलक सध्या गायब झाला असून गेल्या तीन-चार वर्षांपासून या जेटीवर मोठ्या प्रमाणावर मच्छीच्या लॉन्च लावल्या जात आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर मासळी उतरवणे, एजंटांकडून मोठमोठे वजन काटे लावून खरेदी व्यवहार करणे, तसेच लॉन्चवर पाणी भरणे व बर्फ चढविण्याची कामे खुलेआम सुरू आहेत.
या सर्व प्रकारांमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. धाऊलवल्ली ग्रामपंचायतीमार्फत संबंधित व्यावसायिक संघटना, मत्स्य व्यवसाय अधिकारी व पोलिस प्रशासन यांना मागील काही वर्षांत वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. तरीही या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
मासळी वाहतुकीमुळे जेटी परिसरात वाहतुकीचे मोठे अडथळे निर्माण होत असून अनेकदा वादावादीचे प्रसंग घडत आहेत. काही व्यावसायिक प्रामाणिकपणे व्यवसाय करत असले तरी काहीजण अत्यंत उर्मटपणे वागत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या परिसरात दोन मंदिरे असून दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे परिसराच्या पावित्र्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच जेटीवरून जैतापूर खाडी व जुवे बेट येथे जाण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात; मात्र अस्वच्छतेमुळे पर्यटकही पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
परिस्थिती अधिक गंभीर करणारी बाब म्हणजे जेटीवरून नाटेकडे जाणारा तीव्र चढ-उताराचा रस्ता. या मार्गावरून मच्छी वाहतूक करणारे टेम्पो वेगाने धावत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः काही वाहनांवर अप्रशिक्षित नेपाळी चालक बेदरकारपणे गाडी चालवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
या सर्व प्रकारांवर मच्छीमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. प्रामाणिक व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्न असल्याने प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संयमाने वागत असताना काहीजण त्याचाच गैरफायदा घेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
परिसरात दुर्गंधी पसरवणारे, बेदरकार वाहन चालवणारे नेपाळी तसेच अप्रशिक्षित चालकांकडे वाहने देणाऱ्यांविरुद्ध तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वेळेत सुधारणा न झाल्यास प्रशासनाविरोधात आंदोलन उभारण्याचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.




