
रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी सात ’मेनोपॉज क्लिनिक’
बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि धकाधकीच्या दिनक्रमामुळे महिलांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रजोनिवृत्ती (मेनोपॉज) हा त्यातील महत्त्वाचा टप्पा असून, या काळात उद्भवणार्या शारीरिक व मानसिक तक्रारींकडे अनेकदा दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राज्यभरात एकूण ५८० ’मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ७ क्लिनिकचा समावेश आहे.
काळात रजोनिवृत्तीच्या हार्मोन्समधील बदलांमुळे उष्णतेच्या लाटा, झोपेचे विकार, चिडचिड, नैराश्य, सांधेदुखी, अस्थिसुषिरता, वजनवाढ तसेच हृदयविकाराचा धोका वाढण्याच्या समस्या उद्भवू शकतात. खासगी रुग्णालयांतील महागड्या उपचारांमुळे अनेक महिला डॉक्टरांकडे जाणे टाळतात. मात्र आता शासकीय रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
राज्यातील जिल्हा रुग्णालये उपजिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये तसेच निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही क्लिनिक सुरु करण्यात आली आहेत. दर बुधवारी विशेष ’मेनोपॉज ओपीडी चालवली जाणार असून, स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी, आवश्यक वैद्यकीय चाचण्या, औषधोपचार, मानसिक आरोग्य समुपदेशन तसेच जीवनशैलीविषयक मार्गदर्शन दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे महिलांना वेळेवर आणि परवडणार्या उपचारांची सुविधा मिळून त्यांचे आरोग्य अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
www.konkantoday.com




