
शिवसेनेची जिल्हा परिषदेसाठी मोठी रणनीती, उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक
जिल्हा परिषदेच्या गटनेत्याची निवड २३ तारखेला होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. नुकतीच शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, सदानंद चव्हाण, आमदार किरण सामंत व अन्य प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सभापतीपदांबाबत तसेच गटनेते निवडीबाबत महत्वपूर्ण खलबते झाल्याचे समजते. यामध्ये प्रामुख्याने अध्यक्षपदासाठी मंडणगडच्या अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते विलास चाळके यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च पदासाठी म्हणजेच अध्यक्षपदासाठी मंडणगड तालुक्यातील तिडे गटाच्या सदस्या अस्मिता केंद्रे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. त्यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी जवळपास शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे. महिला नेतृत्वाला संधी देवून मंडणगड तालुक्याला झुकते माप देण्याचा प्रयत्न यातून दिसत आहे.
ज्येष्ठ आणि अनुभवी माजी सभापती विलास चाळके यांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी त्यांच्याकडे गटनेते पदाची धुरा सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. केवळ गटनेतेच नव्हे तर उपाध्यक्षपदाची माळही त्यांचयाच गळ्यात पडण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे उपाध्यक्षकांकडे आरोग्य आणि बांधकाम ही महत्वाची खाते असावीत असा ठराव यापूर्वीच झाला असल्याने चाळके यांच्याकडे या महत्वपूर्ण समित्यांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com



