लांजात शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी 20 वर्षीय तरुणाला जन्मठेप

लांजा -येथे एका ११ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी आशितोष अनिल जाधव (वय २०, रा. लांजा) असे जन्मठेप सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे. रत्नागिरी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि २२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अल्पवयीन मुलीवरील या गुन्ह्याला न्यायालयाने गांभीर्याने घेत कठोर शिक्षेचा आदेश दिला.
११ जुलै २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली होती. शाळा सुटल्यानंतर पीडिता दोन सहाध्यायी मुलांसोबत घरी परतत असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने मुलांना धमकावून वेगळ्या रस्त्याने जाण्यास भाग पाडले. घाबरलेल्या अवस्थेत ती दोन्ही मुले निघून गेल्यानंतर आरोपीने पीडितेचा जबरदस्तीने हात पकडून तिला जवळील शासकीय उपकेंद्राच्या मागील बाजूस ओढत नेले आणि अत्याचार केला. घडलेला सर्व प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. घरी परतल्यानंतर मुलगी भयभीत अवस्थेत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांनी धीर देत चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिच्या आईने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (ए) (बी), ५०४, ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) २०१२ अंतर्गत कलम ४, ६, ८, ९ (एम), १० नुसार गुन्हा दाखल केला होता. खटल्या दरम्यान न्यायालयाकडून 11 साक्षीदार तपासण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button