
पुढील चार दिवस राज्यात काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडगडाटासह पाऊस?
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानानंतर आता राज्यात काही ठिकाणी पावसाची चिन्हे आहेत. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात २२ आणि २३ फेब्रुवारी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे थंडी कमी होऊन तापमानात वाढ होऊ लागली आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंश सेल्सियसपेक्षा, तर काही ठिकाणी ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात २२ आणि २३ फेब्रुवारी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडू शकतो. पुणे आणि परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, २२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील काही ठिकाणी अंशतः ढगाळ आकाश, सौम्य मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. याच कालावधीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात विरुद्ध दिशेच्या वाऱ्यांची परस्परसंवाद स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातही ढगाळ वातावरण, हलका पाऊस दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शनिवारी कमाल तापमान सर्वाधिक ३६.३ अंश सेल्सियस सांताक्रुझ येथे नोंदवले गेले. तर किमान तापमान गोंदिया येथे १५.६ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. मध्य महाराष्ट्रातील पुण्यात ३४.६, कोल्हापूर येथे ३३.८, जळगाव येथे ३४.५, मालेगाव येथे ३४.८, नाशिक येथे ३३.७, सोलापूर येथे ३६, कोकणातील रत्नागिरी येथे ३५.६, डहाणू येथे ३१.५, मराठवाड्यातील धाराशिव येथे ३३.६, छत्रपती संभाजीनगर येथे ३४.४, परभणी येथे ३५.३, बीड येथे ३३.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.




