ब्रेकींग

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं; प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर; ७ एप्रिलला प्रसिध्द होणार प्रारूप प्रभाग


मुंबई- राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसह, नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने प्रभाग (वॉर्ड) रचनेचा अधिकृत कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार, येत्या 20 फेब्रुवारी 2026 पासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रभाग रचनेचे काम प्रामुख्याने तीन टप्प्यांत पार पडणार आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष पाहणीवर भर देण्यात आला आहे.

पहिला टप्पा (नकाशे निश्चिती):

तहसीलदार ‘गुगल अर्थ’च्या साहाय्याने २० फेब्रुवारीपर्यंत गावांचे नकाशे अंतिम करतील.

दुसरा टप्पा (प्रत्यक्ष पाहणी):

27 फेब्रुवारीपर्यंत संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पाहणी करतील आणि प्रभागांच्या सीमा निश्चित करतील.

तिसरा टप्पा (मान्यता):

जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर २३ मार्च २०२६ पर्यंत राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावांना अंतिम मान्यता देईल.

हरकती आणि सुनावणीचे वेळापत्रक

नागरिकांना प्रभाग रचनेबाबत आपले मत मांडण्याची संधी मिळावी, यासाठी प्रशासनाने पारदर्शक वेळापत्रक ठरवले आहे.

प्रारूप प्रसिद्धी: 7 एप्रिल 2026 रोजी प्रभाग रचनेचा मसुदा (प्रारूप) जाहीर केला जाईल.

हरकतींची मुदत: नागरिकांना 7 ते 13 एप्रिल 2026 या कालावधीत आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येतील.

सुनावणी: प्राप्त झालेल्या हरकतींवर 21 एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी पार पडेल.

४ मे रोजी होणार अंतिम घोषणा

सर्व हरकतींचा निपटारा केल्यानंतर आणि प्रस्तावांची पडताळणी पूर्ण झाल्यावर, जिल्हाधिकारी 28 एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील. त्यानंतर, 4 मे 2026 रोजी अधिकृतरीत्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे आगामी काळात गावपातळीवरील निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार असून, राजकीय इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button