गुहागरात गवारेड्याची इरटीगा कारला धडक; सुदैवाने जीवितहानी टळली


गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी ते चिखली दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास ओमकार मंगल कार्यालयासमोर गवारेड्याने इरटीगा कारला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने वाहनचालक गंभीर जखमी होण्यापासून बचावला.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहनचालक डिझेल भरण्यासाठी चिखलीकडे जात असताना शृंगारतळी–चिखली मार्गावर अचानक शेजारील जंगलातून गवारेड्या रस्ता ओलांडण्यासाठी आला. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या कारला त्याने जोरदार धडक दिली. धडकेमुळे कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

या घटनेनंतर काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातात जीवितहानी टळली असली तरी वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, या मार्गावर वन्यप्राणी अचानक रस्त्यावर येऊन वाहनांना धडक देण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने या राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या वावरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गुहागर तालुक्यातून जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button