
सीबीएसई परीक्षा आजपासून; दहावीच्या 25 लाख, बारावीच्या 18.50 लाख विद्यार्थ्यांचा कस!
मुंबई : देशातील सर्वांत मोठ्या शालेय परीक्षांपैकी मानल्या जाणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा आज, मंगळवारपासून देशभरात सुरू होत आहेत. दहावीसाठी २५,०८,३१९ विद्यार्थी नोंदणीकृत असून, त्यापैकी १४,०८,५४६ मुले आणि १०,९९,७७३ मुली आहेत. बारावीच्या परीक्षेला १८,५९,५५१ विद्यार्थी बसणार असून, त्यात १०,२७,५५२ मुले आणि ८,३१,९९९ मुलींचा समावेश आहे. दोन्ही स्तरांवर मुलींची लक्षणीय उपस्थिती कायम असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
परीक्षेच्या सुरळीत व पारदर्शक आयोजनासाठी देशभरात दहावीसाठी ८,०७५ तर बारावीसाठी ७,५७४ परीक्षा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. दहावीमध्ये ८३ विषयांची, तर बारावीमध्ये १२० विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. मोठ्या संख्येने उमेदवार असल्याने नियंत्रण कक्ष, अतिरिक्त निरीक्षक, देखरेख पथके आणि तांत्रिक तपासणी व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रत्येक वर्षीप्रमाणे समाजमाध्यमांवर पेपरफुटी किंवा बनावट प्रश्नपत्रिका यांसंदर्भातील अफवा पसरवल्या जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मंडळाने विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. अप्रमाणित संदेश पुढे पाठवू नयेत, केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणी गोंधळ न घालता वेळेआधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे, आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
परीक्षा आकडेवारी
घटक-एकूण विद्यार्थी -एकूण विषय- एकूण केंद्रे -मुले -मुली
दहावी – २५,०८,३१९ -८३ -८,०७५ -१४,०८,५४६ -१०,९९,७७३
बारावी – १८,५९,५५१ -१२० -७,५७४ -१०,२७,५५२ -८,३१,९९९




