गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त लाखो लोक जमले

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ४५ व्या शिवरात्री उत्सवादरम्यान भाविकांनी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या ऐतिहासिक अवशेषांचे दर्शन घेतले.

१५ फेब्रुवारी २०२६, बेंगळुरू: महाशिवरात्रीच्या शुभ रात्री, जागतिक आध्यात्मिक गुरु गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनात गहिरे ध्यान करताना अलौकिक परमानंदात न्हाऊन जात लाखोंहून अधिक भाविकांनी स्तब्ध शांततेचे क्षण अनुभवले.

आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये महाशिवरात्रीचा भव्य उत्सव पार पडला आणि अनेक भाविक, मनाला साद घालणारे संगीत, गुरुदेवांच्या उपस्थितीतले गहिरे परिवर्तनकारी ध्यान आणि पवित्र मंत्रांनी भारलेले सकारात्मक, आनंदमय आणि उत्सवपूर्ण वातावरणात साजऱ्या झालेल्या या वैदिक समारंभाच्या रम्य आठवणी घरी घेऊन गेले.

“महाशिवरात्रीत चेतना भौतिक जगतापासून वर अलौकिक तत्वाकडे घेऊन जाते,” गुरुदेवांनी सांगितले, “शिव प्रत्येक कणात उपस्थित असतो. आपल्या चेतनेचे खरे स्वरूप शिव आहे. शिवात मग्न असणे म्हणजे भक्ती आणि प्रत्येकामध्ये शिव पाहणे म्हणजे सेवा. जे अविनाशी तत्व आहे ते आपल्या आतच आहे एवढी श्रद्धा आपण ठेवली तरी आपण आनंदी होतो. जीवनात कोणतीही कमतरता राहणार नाही. असे मानले जाते की जर आपण शिवरात्रीत भक्ती आणि प्रेमाने सहभागी झालो तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.” “महाकाल कसा प्रकट होतो? तर तो योग्यांच्या हृदयात प्रकाशासारखा चमकतो,” गुरुदेव म्हणाले.

संध्याकाळचे मुख्य आकर्षण म्हणजे पवित्र रुद्र पूजा, भगवान शिवाचे परोपकारी रूप असलेल्या भगवान रुद्राच्या पूजेला समर्पित एक शक्तिशाली वैदिक समारंभ. रुद्र पूजा शिवाच्या परिवर्तनकारी उर्जेचे आवाहन करते, जी नकारात्मकतेचा विलय आणि उच्च चेतनेच्या जागरणाचे प्रतीक आहे. श्री रुद्रममधील प्राचीन वैदिक मंत्रांमध्ये उल्लेखलेले हे विधी पर्यावरण शुद्ध करतात, सामूहिक चेतना उन्नत करतात तसेच व्यक्ती आणि समाजासाठी शांती, समृद्धी दायक आणि कल्याणकारी असतात
असे मानले जाते. भारत आणि परदेशात मिळून १५० ठिकाणी रुद्र पूजा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये कॅनडा, दुबई, जर्मनी इत्यादींचा समावेश आहे.

आश्रमातील या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थितांना मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगमच्या अलिकडेच सापडलेल्या अवशेषांचे दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी मिळाली होती. असे मानले जाते की १०२६ मध्ये मोहम्मद गझनीने केलेल्या हल्ल्यात ते नष्ट झाले होते.

रुद्रम श्लोकांचे शक्तिशाली जप, वैदिक विधी आणि भावपूर्ण गायन यामधे सहभाग घेण्यासाठी ब्राझील, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, मलेशिया, थायलंड, बल्गेरिया, अरब राष्ट्रे, चीन, युरोप, आग्नेय आशिया, मध्य पूर्व यासारख्या विविध ५० देशातून सहभागी झालेले लोक संध्याकाळी नाचत गात आणि ध्यान करत रममाण झाले होते.

आश्रमात पहिल्यांदाच भेट देणाऱ्या नेदरलँड्सच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षिका ८० वर्षीय अंकेई म्हणाल्या, “येथे वातावरण खूप आनंदी होते, लोक खूप छान, खूप सुंदर आणि मदत करणारे आहेत. गुरुदेवांचे पूजेसाठी आगमन होताना पाहून माझे डोळे भरून आले. माझ्यासाठी तो खूप आनंदाचा आणि समाधानाचा क्षण होता.”
२० वर्षांपासून आर्ट ऑफ लिव्हिंगशी संबंधित असलेल्या रशियातील ओल्गा म्हणाल्या, “इथे येणे म्हणजे आपल्या घरीच येण्यासारखे आहे. मला इथे उत्साही आणि निवांत वाटते, आणि तीच ऊर्जा आणि आनंद माझ्या देशात परत घेऊन जाईन आणि तिथल्या लोकांसोबत वाटून घेईन.”
आश्रमात पहिल्यांदाच आलेल्या डच नागरिक इसाबेल म्हणाल्या, “मला इथे खूप आवडते. वातावरण भक्ती आणि उर्जेने भरलेले आहे आणि इथल्या सर्व वनस्पती आणि प्राणी पहा , संगीत आणि गुरुदेवांची उपस्थिती यामुळे सर्वांमध्ये वेगळीच चमक दिसते !”

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हजारो स्वयंसेवकांनी दिवसभरात ३ लाखांहून अधिक भाविकांना १५ टनांहून अधिक भाज्या वापरून तयार केलेले
महाप्रसादाचे जेवण वाढले. या दिवशी आश्रम एक शुचितेचे केंद्र बनले होते, ज्यात गुरुदेवांच्या उपस्थितीत २४ हून अधिक वैदिक विवाह आणि साठी शांती चे कार्यक्रम पार पडले.

ऑफलाइन कार्यक्रमाव्यतिरिक्त, या विक्रमी उत्सवात लाईव्ह वेबकास्टद्वारे १२० देशांमधून १ लाखाहून अधिक लोकांनी ऑनलाइन उत्सवात सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button