श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची सायकलफेरी

रत्नागिरी : श्री गजानन महाराज (शेगांव) प्रकट दिनानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजित रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित जय गजानन सायकल राईडला उदंड प्रतिसाद मिळाला. ही सायकल फेरी शरीराला तंदुरुस्त ठेवणारी, मनाला शांतता देणारी आणि भक्तीची ऊर्जा प्रदान करणारी ठरली.

नाचणे पॉवरहाऊस येथील श्री गजानन महाराज मंदिर ते गोळप येथील श्री गजानन महाराज मंदिरापर्यंत ही सायकल फेरी काढण्यात आली. जय गजानन, श्री गजानन असा जयघोष करत या सायकल फेरीमध्ये क्लबचे सदस्य आणि रत्नागिरीकर सहभागी झाले. श्रद्धा, आरोग्य आणि एकात्मता यांची सांगड या फेरीने घातली.

सकाळी ६.३० वाजता नाचणे येथे महाराजांचे दर्शन घेऊन फेरीला सुरवात करण्यात आली. या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष म. वा. देसाई यांनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक क्लबचे अध्यक्ष महेश सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. ही फेरी जयस्तंभ मार्गे भाट्ये, वायंगणी, कोळंबे फाटा, फिनोलेक्स फाटा मार्गे गोळप येथे पोहोचली.

सायकल फेरीमध्ये सात ते ७४ वर्षे वयोगटातील ३५ सायकलस्वारांनी भाग घेतला. सात वर्षांचा वेदांत विनायक पावसकर आणि ७४ वर्षांचे गजानन भातडे हे न चुकता या फेरीत सहभागी होत असल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. शालेय विद्यार्थीही या सायकल फेरीत आनंदाने सहभागी झाले. गोळप येथे कोतवडे, सड्ये, बसणी या भागातून हौशी सायकलस्वारही रत्नागिरी सायकलिस्ट क्लबसोबत सामील झाले. गोळप येथे मंदिरापर्यंत सायकल फेरी पोहोचल्यानंतर श्री गजानन महाराज देवस्थानचे माधव गोगटे यांनी सायकलस्वारांचे स्वागत केले. दर्शन घेतल्यानंतर मंदिरातर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. ही फेरी भक्तीचा अनुभव, आरोग्यासाठी व्यायाम आणि सायकलप्रेमींची एकत्र साधना यांचा सुंदर संगम ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button