
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार ५ फेब्रुवारी रात्री १० नंतर बंद ; उल्लंघन झाल्यास कारवाई
रत्नागिरी, दि.४ ): राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार, रत्नागिरी जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता प्रचार समाप्त होत आहे. प्रशासनाने यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले असून, त्यानंतर कोणत्याही स्वरूपाचा जाहीर प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास तो आदर्श आचारसंहितेचा भंग मानला जाईल. अशा कसूरवार व्यक्ती किंवा उमेदवाराविरुद्ध अधिनियमाच्या पोटकलम २ अन्वये कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांनी दिला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या २९ जानेवारी २०२६ च्या आदेशानुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम २८-ब मधील तरतुदींनुसार, मतदान सुरु होण्याच्या दिनांकापूर्वी २४ तास अगोदर जाहीर प्रचार कालावधी समाप्त होत आहे. त्यानुसार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता हा प्रचार कालावधी संपुष्टात येत आहे.
प्रशासनाकडून उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांना खालील सूचना देण्यात येत आहेत:
५ फेब्रुवारीला रात्री १० वाजेनंतर कोणत्याही सभा किंवा मोर्चे काढता येणार नाहीत.
ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker) वापर करण्यास पूर्णतः बंदी असेल.
निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्धी किंवा प्रसारण देखील बंद ठेवावे लागेल.
या कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्यास तो आदर्श आचारसंहितेचा भंग मानला जाईल. अशा कसूरवार व्यक्ती किंवा उमेदवाराविरुद्ध अधिनियमाच्या पोटकलम २ अन्वये कडक कारवाई करण्यात येईल.




