‘शिवसेना पक्ष वारसा हक्काने मिळत नाही’; रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


पक्षचिन्हावरील युक्तिवादाच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट; संजय राऊतांवरही टीकास्त्र


खेड : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या युक्तिवादावरून माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करताना, ‘नाण्याला दोन बाजू असतात. सध्या एक बाजू मांडली गेली आहे. आमच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर येईल,’ असे कदम यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली असून, पुढील सुनावणीत आपल्या पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला जाणार आहे. त्यामुळे एकाच बाजूच्या युक्तिवादावरून निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे कदम यांनी नमूद केले.
‘पक्ष हा वारसा हक्काने मिळत नसतो. वारसा हक्काने मालमत्ता मिळते,’ असे सांगत कदम यांनी शिवसेना पक्षावरील मालकीच्या दाव्यावर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेपासून फारकत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेना-भाजप युती म्हणून निवडणूक लढविण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. हा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात असल्याचे कदम म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सत्तेच्या पदासाठी निवडणूक लढविली नाही किंवा विधिमंडळात प्रवेश केला नाही. त्यामुळे बाळासाहेबांची विचारधारा कोण पुढे घेऊन जात आहे, याचा विचार झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षातील बहुमताच्या मुद्द्यावर बोलताना कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या संख्येचा दाखला दिला. शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला ४० आमदार होते आणि त्यानंतर निवडणुकीत ६० आमदार निवडून आले, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे पक्ष कोणाचा याचा निर्णय घेताना आमदारांचे बहुमत आणि जनतेचा कौल याचाही विचार झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना कदम यांनी, ‘संजय राऊत यांचे कामच ढोल वाजविण्याचे आहे,’ असा टोला लगावला. आम्ही कोणत्या पक्षात जाणार, यापेक्षा उद्धव ठाकरे पुढे कोणत्या राजकीय पक्षासोबत जाणार, याची चिंता त्यांनी करावी, असेही कदम यांनी म्हटले.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. या प्रकरणात न्यायालयावर आणि न्यायाधीशांवर आपला पूर्ण विश्वास असून, ‘आम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल,’ असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button