
समीर शिगवण यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार
प्रसिद्धीपासून दूर असलेले येथील पत्रकार समीर शिगवण यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने मुंबई सानपाडा येथे गौरविण्यात आले आहे. दिशा महाराष्ट्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा सन्मान प्रदान करण्यात आला. रविवारी, १ फेब्रुवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
त्यांना यापूर्वी गाव विकास समितीचा समाजरत्न, कळंबस्ते येथील कुणबी महोत्सवात रत्नागिरी भूषण आणि आज राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
पुरस्कार वितरण प्रसंगी दिशा महाराष्ट्राची यू ट्यूब चॅनेल आणि वेब पोर्टलचे मुख्य संपादक तुषार नेवरेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्माराम चव्हाण, प्रमुख पाहुण्या अर्चना मोहिते, अभिनेता राजेश जाधव, ऍड. विजय उंबरे, निखिल सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
समीर शिगवण यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल दिशा महाराष्ट्राची या चॅनेलने दखल घेत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. गेल्या १९ वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांनी दैनिक रत्नागिरी टाइम्स, प्रहार या वृत्तपत्रांतून काम केल्यानंतर सध्या ते तरुण भारत या नामांकित दैनिकात उपसंपादक पदावर कार्यरत आहेत.
पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यातही शिगवण यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी शेकडो गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत केली असून आर्थिक सहाय्यही दिले आहे. हे कार्य ते सातत्याने अनेक वर्षांपासून करत आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात देवरुख व रत्नागिरी परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या व साहित्य वाटप केले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे कामही त्यांनी केले आहे.
‘ग्रामीण वार्ता’ या डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून त्यांनी राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि गुहागर तालुक्यातील अन्यायग्रस्त नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. शासनदरबारी निर्भीडपणे आणि सडेतोड शब्दांत मांडलेल्या या प्रश्नांमुळे अनेकांचे रखडलेले प्रश्न मार्गी लागले असून, न्याय मिळालेल्या नागरिकांकडून शिगवण यांचे आभार मानले आहेत.
राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




