हिंदू–मुस्लिम ऐक्याचे अढळ प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातिसच्या पीर बाबरशेख बाबांचा उरूस २ व ३ फेब्रुवारी रोजी


कोकणातील धार्मिक सलोखा आणि रत्नागिरी तालुक्यातील हातिस येथील श्री पीर बाबरशेख बाबांचा वार्षिक उरूस यंदा दिनांक २ व ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. नवसाला पावणारे देवस्थान अशी ख्याती असल्याने या उरूसासाठी कोकणाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मोठी गर्दी उसळते.

पीर बाबरशेख बाबांच्या चरणी नतमस्तक झालेल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. आयुष्यातील अडचणी, संकटे दूर व्हावीत यासाठी अनेक भक्त येथे प्रार्थना करतात. दरवर्षी नवस बोलणाऱ्या व नवस फेडणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. ही गर्दी लक्षात घेता दर्शन व नवस फेडण्यासाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. या उरूसाचे मुख्य आकर्षण म्हणजे गिलाफ मिरवणुकीदरम्यान होणारा पारंपरिक शस्त्रास्त्रांचा खेळ. गावातील पटांगणात सादर होणारे हे चित्तथरारक खेळ पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी हातिस ग्रामविकास मंडळाकडून दरवर्षी नियोजन केले जाते. त्यानुसार यंदाही खासगी वाहने तसेच एस.टी. बससाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाकडून रत्नागिरी विभागातून जादा बसफेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

शांततामय व भक्तीमय वातावरणात पार पडणाऱ्या या उरूसासाठी हातिस ग्रामस्थ आणि ग्रामविकास मंडळाने जय्यत तयारी केली असून, सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button