
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरणार मैदानात७ दिवसात ३३ सभा घेणारउद्या चिपळुणात जाहीर सभा
राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचारासाठी सक्रिय होणार आहेत. फडणवीस यांच्या प्रचार दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून आगामी काळात या निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. चिपळूण येथे उद्या बुधवारी दुपारी एक वाजता नगर परिषदेच्या सावरकर मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजप नेते प्रशांत यादव यांनी दिली
महानगर पालिका निवडणुकीतील यशानंतर आता जिल्हा परिषदांवरही भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली असून, 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या सात दिवसांच्या काळात ते राज्याचा झंझावाती दौरा करणार आहेत. या मोहिमेत फडणवीस 12 जिल्ह्यांमध्ये एकूण 22 जाहीर सभा घेणार असून, दौऱ्याची सुरुवात 28 जानेवारीला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकणातील जिल्ह्यांतून होणार आहे. पक्षाची ताकद ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतः फडणवीस मैदानात उतरल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले असून, आगामी निवडणुकीत सर्व जिल्हा परिषदा काबीज करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावल्याचे स्पष्ट होत आहे.




