
सासूचे ८ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने जावयानेच लंपास केले; दापोली पोलिसांकडून अटक
दापोली तालुक्यातील पालगड-कातळवाडी येथे सासूच्या घरातून तब्बल ८ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या जावयाला दापोली पोलिसांनी अटक केली आहे. संशयित जावई विजय जयराम नामूगडे याच्याकडून चोरीचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालगड-कातळवाडी येथे राहणाऱ्या शुभांगी विष्णू दळवी या ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७.४५ ते ९.१० वाजण्याच्या दरम्यान घराला कुलूप लावून गुरे चारण्यासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने घराच्या मागील बाजूच्या किचनमधील स्लायडिंग खिडकीतून घरात प्रवेश केला. बेडरूममधील बेडवर ठेवलेल्या पिशवीतील दागिन्यांची पर्स चोरून त्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले.
दळवी यांनी चोरीची तक्रार दाखल करताना त्यांचे जावई विजय जयराम नामूगडे याच्यावर संशय व्यक्त केला. त्यानंतर दापोली पोलिसांनी नामूगडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने सासूच्या घरातून दागिने चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले.
याप्रकरणी दापोली पोलिसांनी विजय जयराम नामूगडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे करीत आहेत.
सासूच्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या जावयाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणामुळे पालगड परिसरात चर्चेला उधाण आले आहे.




