
गुहागरमध्ये फिरत्या मोबाईल व्हॅन लोक अदालतीतून १४ प्रकरणे निकाली
गुहागर तालुका विधी सेवा समिती, गुहागर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फिरत्या मोबाईल व्हॅन लोकअदालतीतून एकूण १४ प्रकरणे यशस्वीरीत्या निकाली काढण्यात आली.
तालुका विधी सेवा समिती, गुहागर यांच्या पुढाकाराने फिरत्या मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा गुहागर दिवाणी न्यायाधीश पी. व्ही. कपाडीया यांच्या हस्ते सर्व वकीलवर्ग, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर ही लोकअदालत व्हॅन पाटपन्हाळे येथील लोकअदालतीच्या ठिकाणी रवाना करण्यात आली.
या मोबाईल लोक अदालतीत दिवाणी न्यायालय, गुहागर येथील प्रलंबित सहा प्रकरणे तसेच आठ प्रीलिटिगेशन प्रकरणे अशी एकूण १४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व प्रकरणांतून २७ हजार ४७७ रुपयांची तडजोड साध्य झाली.या लोकअदालतीसाठी पॅनल प्रमुख म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश डी. एस. जामखेडकर यांनी काम पाहिले, तर पॅनल विधीज्ञ म्हणून अॅड. सुशील अवेरे यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे महिलांच्या कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियमांतर्गत दाखल असलेल्या एका प्रकरणात पती-पत्नीमधील कौटुंबिक वादात सलोखा निर्माण होऊन दोघांनी नव्याने संसाराला सुरुवात केल्याने लोकअदालतीच्या माध्यमातून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.
तालुका विधी सेवा समितीच्या वतीने अशा फिरत्या मोबाईल व्हॅन लोकअदालतीच्या माध्यमातून नागरिकांना न्यायप्रक्रियेचा लाभ घराजवळच मिळावा, या उद्देशाने पुढील काळातही उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.




