
शिवसेना-भाजप युतीकडून गुहागरमधील १५ पैकी १२ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल
तीन ठिकाणच्या उमेदवारी बाबत अजूनही संभ्रम कायम

रत्नागिरी जिल्हा परिषद तसेच गुहागर पंचायत समितीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना गुहागर मधील शिवसेना-भाजप युतीच्या १२ उमेदवारांनी आज गुहागर तहसील कार्यालयात भव्य दिव्य शक्ती प्रदर्शन करत शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण तसेच गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
गुहागर पंचायत समितीच्या १० जागांसाठी भाजप शिवसेनेकडून ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर ५ जिल्हा परिषदेच्या जागांसाठी ४ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उरलेल्या दोन पंचायत समिती गणाच्या व एका जिल्हा परिषद गटाच्या म्हणजेच आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव उभे असलेल्या असगोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारीबाबत भाजप शिवसेनेमध्ये एकमत नसल्याने त्या ठिकाणचे उमेदवार युतीकडून अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे अंजनवेल, पाचेरी सडा पंचायत समिती गण व विक्रांत जाधव उभे असलेला असगोली जिल्हा परिषद गट येथे युती कडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहील आहे.




