मुंबई हडप करण्याचा भाजपचा डाव, विनायक राऊतांचा रत्नागिरीत खळबळजनक आरोप


भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी मुंबईचा महापौर कशासाठी हवा होता, याचे खरे कारण आता समोर आले असून मुंबई हडप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असा खळबळजनक आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबईतील बिहार भवनाच्या प्रस्तावावरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. वांद्रे येथे आधीच उत्तर प्रदेश भवन झाले असून आता बिहार भवनचा घाट घातला जात आहे. इतकेच नव्हे तर गुजरात भवनसाठी पूर्ण पालघर जिल्हा देवू केला असून उद्या बीकेसीमध्ये गुजरात भवन उभे राहिले तरी नवल वाटायला नको, असे सांगत हा मुंबई बळकावण्याचा भाजपचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले. याला उद्धव ठाकरे सेना आणि मनसे कडाडून विरोध करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कल्याण-डोंबिवलीतील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राऊत यांनी सत्ताधारी महायुतीतील संघर्षावर बोट ठेवले. तेथे अत्यंत घाणेरडे राजकारण सुरू असून भाजप आणि शिंदे गट एकमेकांचे उमेदवार पळवत असल्याचा दावा त्यांनी केला. ठाकरे गटाच्या नगरसेवकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे राऊत म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या ११ नगरसेवकांची बैठक घेण्यात आली असून, आपले नगरसेवक कोणत्याही हॉटेलमध्ये नसून सुरक्षित ठिकाणी पदाधिकार्‍यांच्या घरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या नगरसेवकांचे संरक्षण करणे हे पक्षाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button