दापोलीत संत भगवानबाबा व वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात

दापोली : ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा व वैराग्यमूर्ती पूज्य वामनभाऊ महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त आयोजित स्मृतिसोहळा शनिवारी दापोली येथे अत्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दापोली व परिसरातील वंजारी समाजातील नागरिक, अधिकारी, कार्यकर्ते व भाविकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री दादा ईदाते यांच्या हस्ते झाली. पद्मश्री दादांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या सामाजिक कार्याच्या आठवणी सांगत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या अध्यक्षा संपदा पारकर यांनी आज वंजारी समाजातील युवक विविध क्षेत्रांत अधिकारी म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेत, ही समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त केले.

याप्रसंगी वराडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी शिक्षण, स्पर्धा परीक्षा व समाजातील तरुणांच्या प्रगतीबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच वंजारी महासंघ महिला आघाडी (महाराष्ट्र) प्रदेशाध्यक्ष डॉ. सुवर्णा कराड यांनी कुटुंबसंस्कार, शिक्षण आणि सामाजिक अस्मिता यांचे महत्त्व स्पष्ट करत मी वंजारी आहे ही ओळख अभिमानाने जपा, असा संदेश दिला.

सायंकाळी हभप सुदर्शन महाराज शास्त्री (पाथर्डी) यांच्या प्रभावी प्रवचनाने कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. “देव कुणाला प्रत्यक्ष दिसत नाही” या विषयावर त्यांनी शिक्षणाच्या महत्त्वाचे अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण सांगत समाजाला दिशा देणारे विचार मांडले. त्यांनी सांगितलेली कथा उपस्थित भाविकांच्या मनाला स्पर्श करून गेली.

या पुण्यतिथी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही औपचारिक अध्यक्ष अथवा संयोजक नसतानाही सर्व समाजबांधवांनी एकत्र येत सामूहिक नियोजनातून हा उपक्रम अत्यंत यशस्वी केला. प्रवचनानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद व स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोकुळ घुले यांनी सर्व समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button