
भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या जन्मभूमीला म्हणजे राजापूरला भेट दिली
भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अजूनही कसोटी क्रिकेट मध्ये खेळले पाहिजे होते अशी स्पष्ट भूमिका भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी राजापूर येथे मांडली.राजापूर या आपल्या जन्मभूमीला वेंगसरकर यांनी गुरुवारी भेट दिली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजापूर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, सल्लागार महेश शिवलकर, सचिव राजेंद्र बाईत, सहसचिव प्रकाश नाचणेकर, सदस्य संतोष मोंडे, राजेंद्र जोंगले, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
राजापूरमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यावेळचे बालपण कसे होते. याचा पटच त्यांनी उलगडला. आपल्या जन्मापासून इथे झालेले शिक्षण तो कालखंड उलगडताना आजूबाजूला असलेले शेजारी यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. राजापूर शहरातील माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभात महादेव कुलकर्णी हे वेंगसरकर यांचे नात्याने मामा असल्याने त्यांच्या आजोळच्या आठवणी त्यांनी शेअर केल्या. वेंगसरकर यांच्या समवेत महाराष्ट्र क्रिकेटचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ, मिलिंद कुलकर्णी आदी सहकारी गुरुवारी राजापूर मध्ये आले होते.




