कणकवली तालुक्यातील ओसरगाव ते कुडाळ दरम्यान ब्लू डार्ट कुरिअर कंपनीच्या कंटेनरला अडवून लुटण्याचा प्रयत्न, पळून जाताना गाडीला अपघात


कणकवली तालुक्यातील कणकवली तालुक्यातील ओसरगाव ते कुडाळ दरम्यान ब्लू डार्ट कुरिअर कंपनीच्या कंटेनरला अडवून लुटण्याचा प्रयत्नओसरगाव ते कुडाळ दरम्यान ब्लू डार्ट कुरिअर कंपनीच्या कंटेनरला अडवून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळाजनक घटना मंगळवार 30 डिसेंबर रोजी पहाटे घडली. याबाबत कंटेनर चालकाने कुडाळ पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी गाडीच्या नंबर वरून संशयित बलेनो कारचा पाठलाग केला.पोलिस आपला पाठलाग करत असल्याचे पाहून संशयितांनी कार भरधाव पळवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात सदर कार कुडाळ-वेंगुर्ला मुख्य रस्त्यावर भीषण अपघात घडून आला. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात कार चालक सुजल सचिन पवार (21, झाराप) या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलिस ठाणे, सिंधुदुर्ग येथे कार्यरत पोलिस उपनिरीक्षक गणेश रमेश कऱ्हाडकर हे 30 डिसेंबरच्या पहाटे 5 वा. कुडाळ पोलिस ठाणे हद्दीत रात्र गस्तीवर होते. त्यावेळी ब्लू डार्ट कुरिअरचा कंटेनर अडवून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यात देण्यात आली. ब्लू डार्टचे शिफ्ट इन्चार्ज शिवराम पराडकर व चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळकडे येत असताना ओसरगाव टोलनाका पार केल्यानंतर एका राखाडी रंगाच्या बलेनो कार मधील तरूणांनी कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने गाडी न थांबवल्याने संशयितांनी कंटेनरचा कारमधून पाठलाग सुरू केला. पणदूर तिठा दरम्यान कारने कंटेनरला भेट देत ती कंटेनेर समोर आडवी घालून कंटेनर अडविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सदर तरूणांनी कंटनेरवर दगडफेक केली. यात कंटेनरच्या बाजूच्या आरशाचे नुकसान झाले.

या घटनेनंतर पोलिस उपनिरीक्षक कऱ्हाडकर व त्यांच्या पथकाने संशयित बलेनो कारचा शोध सुरू केला. कार आढळताच पोलिसांनी पहाटे 2.40 वा. कारचा पाठलाग सुरू केला. पोलिस पाठलाग करत असल्याचे पाहून संशयितांनी कार भरधाव वेगाने पळवण्यास सुरूवात केली. अतिवेगामुळे अनियंत्रीत झालेली कार कुडाळ-वेंगुर्ला मुख्य रस्त्यावरील माठेवाडा नक्षत्र टॉवरजवळ प्रथम गीता हॉटेल समोरील सिंधुदुर्ग बँकेच्या एटीएमला धडकली. पुढे जात ती रस्त्यालगतच्या एका चहाच्या स्टॉलला तसेच वॅगनर कारला धडकली. या अपघातात बलेनो कारच्या एअरबॅग्स उघडल्याने संशयित बचावले. मात्र कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघातानंतर कारमधून चार तरुण बाहेर पडले. पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी या चौघांनाही तात्काळ पकडले. प्राथमिक चौकशीत त्यांनी आपली नावे सुजल सचिन पवार (22, रा. झाराप), राहुल अमित शिरसाट (19, रा. कुडाळ), सिद्धांत अशोक बांदेकर (25, रा. कुडाळ) व मंदार सोनू उमरकर (19, रा. कुडाळ) अशी सांगितली. चौकशीत हीच कार ब्लू डार्ट कंटेनरचा पाठलाग करत असल्याचे निष्पन्न झाले.सदर कार सुजल सचिन पवार (रा. झाराप) याच्या नावे नोंद आहे. तर चौकशीत प्रशांत नितीन सावंत (24), प्रज्वल नितीन सावंत (21, दोघे रा. वेताळबांबर्डे) हे वाटेत घरी उतरल्याचे या चौघांनी सांगितले. या नुसार पोलिसांनी तत्काळ वेताळबांबर्डे येथे जात त्यांना घरातून ताब्यात घेतले.

या अपघातात नुकसान झालेल्या वॅगनर कारचे मालक अनिल ऊर्फ बंड्या सावंत यांनी आपल्या कारच्या झालेल्या नुकसानीबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे मान्य केले. याबाबत पोलिस निरीक्षकांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button