
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खा. विनायक राऊत पक्ष वाढवण्याऐवजी संपवण्याच्या प्रयत्नात, उपजिल्हाप्रमुख सचिन आंब्रे यांचा आरोप
रत्नागिरी जिल्ह्यात उबाठा शिवसेना पक्षात मोठी अंतर्गत कलहाची ठिणगी पडली असून पक्षातील दोन गटांमधील वाद आता उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. उत्तर रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख सचिन आंब्रे यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले असून गंभीर आरोप केले आहेत. थेट आरोपांची झोड त्यांनी उठवली आहे.
विनायक राऊत यांनी पक्ष वाढवण्याऐवजी उबाठा संघटना संपवण्याचा प्रयत्न केला, असा हल्लाबोल आब्रे यांनी केला आहे. रत्नागिरीत पक्षाचे ज नगरसेवक निवडून आले, ते विनायक राऊतांमुळे नाही तर आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वामुळे निवडून आले आहेत, असेही आंब्रे म्हणाले. त्यामुळे विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांच्यातील अंतर्गत संघर्ष आता उघड झाला असून जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर असताना विनायक राऊत कुठे आहेत? असा सवाल उपस्थित करत आंब्रे यांनी राऊतांवर मैदान सोडून पळ काढळ्याचा आरोपही केला,. ते म्हणाले, माझं पद गेलं तरी चालेल, पण विनायक राऊतांच्या कृत्यांचे पाढे मी वाचणारच. पक्षाची गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. या थेट आरोपामुळे शिवसेना उबाठामधील अंतर्गत फूट अधिकच गडद झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com




