
समीर नार्वेकरला अटक करा;TWJ गुंतवणूकदारांचा पोलीस स्थानकात गोंधळ
TWJ गुंतवणूक प्रकरणात चिपळूण येथील गुंतवणूकदारांचा संताप सोमवारी उफाळून आला. समीर नार्वेकर याला तातडीने अटक न झाल्यास पोलीस स्थानकाबाहेर आत्मदहन करू, असा इशारा संतप्त गुंतवणूकदारांनी दिला. पोलीस स्थानकात मोठ्या संख्येने जमलेल्या गुंतवणूकदारांनी तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन छेडले.
“समीर नार्वेकरला अटक करा… नाहीतर आम्ही पकडून देऊ!”
या घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेक वृद्ध महिला, प्रतिष्ठित नागरिक आणि फसवणुकीचे बळी झालेले गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यासह राज्यातील शेकडो गुंतवणुकादारांना गंडा घालणार्या टीडब्ल्यूजे कंपनी संचालकाविरोधात तक्रार देऊनही त्यांना अटक झाली नाही. परिणामी पैसे मागण्यास गेलेल्या गुंतवणूदारांवरच पोलिस तक्रारी केल्या जात आहेत.यामुळे संतापलेल्या गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली. कंपनीच्या संचालकांना अटक का होत नाही, याचा जाब विचारला आणि चिपळूण पोलिस निरीक्षक यांना घेराव घातला. 31 डिसेंबर अखेर कंपनी संचालकांना अटक न झाल्यास पोलिस ठाण्यासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा गुंतवणूकदारांनी दिला आहे.
कामथे (ता. चिपळूण) येथील प्रतिक दिलीप माटे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर टीडब्ल्यूजे कंपनीचा घोटाळा उघडकीस आला. कंपनी संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर, सहकारी संकेश रामकृष्ण घाग व सिद्धेश शिवाजी कदम या चौघांवर 28 लाख 50 हजार रूपयांच्या फसवणूक प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या कंपनी विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
गुंतवणुकीची रक्कम काही दिवसात देतो, अशी आश्वासने सातत्याने देण्यात आली. मात्र फेब्रुवारी नंतर एकाही गुंतवणूकदारास एक कवडीही मिळाली नाही. दरम्यान गुन्हा दाखल झालेले समीर नार्वेकर, संकेश घाग यांचा ठावठिकाणा पोलिसांना लागलेला नाही. गुंतवणूकदार संचालकांच्या आई-वडीलांच्या भेटी घेत आहेत. गुंतवणूकदार तगादा लावत असल्याने रामकृष्ण घाग यांनी चिपळूण पोलिसांत धमक्या मिळत असल्याची तक्रार दिली होती.गुंतवणूकदारांनी चिपळूण पोलिस ठाण्यात धडक दिली. पोलिस निरीक्षक? ? फुलचंद मेंगडे यांच्याकडे विचारणा केली. टीडब्ल्यूजे कंपनी संचालकाविरोधात तक्रार करूनही त्यांना अटक होत नसल्याचा मुद्दा गुंतवणूकदारांनी मांडला. त्यावर मेंगडे म्हणाले, या प्रकरणी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून तपास सुरू आहे. या तपासासाठी एसआयटीची स्थापना झाली असून त्यांनी कामाला सुरुवात देखील केली आहे. कंपनीची मालमत्ता ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. या सार्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे.




