
कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनतर्फे रत्नागिरी तालुका एकदिवसीय शेतकरी कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ नोव्हेंबर रोजी “सत्यमेव जयते फार्मर कप २०२६” रत्नागिरी तालुका एकदिवसीय शेतकरी कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, कृषी विकास अधिकारी अभिजीत गडदे, रत्नागिरीचे उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख, पाणी फाउंडेशनचे तज्ञ प्रशिक्षक संदेश कारंडे, परीक्षक सुहास मोहिते, रोशनी जाधव, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे उपस्थित होते.
यावेळी पाणी फाउंडेशनच्या सर्व प्रशिक्षकांनी फार्मर कप संकल्पना, सहभागी होण्याची या पद्धती, शेतकरी गट निवड, तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्यात आली. त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी विकास मेढे यांनी सर्व शेतकऱ्यांना महाविस्तार एआय ॲप संदर्भात माहिती दिली व उपस्थित सर्व शेतकऱ्यांना ॲप डाऊनलोड करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी “पीएमएफएमई” योजनेसंदर्भातही सर्वांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी, पत्रकार प्रतिनिधी आणि सुमारे १५७ शेतकरी उपस्थित होते.




