
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची ‘हेरिटेज राईड’दहा कातळशिल्पांच्या समूहाला भेट
हेरिटेज विक’निमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि निसर्गयात्री संस्थेने कोळंबे येथे कातळशिल्प पाहण्यासाठी रविवारी सायकल राईडचे यशस्वी आयोजन केले. जागतिक वारसा स्थळांमध्ये नामांकित झालेली कातळशिल्पे पाहणे हा या सायकल राईडचा उद्देश होता. यामध्ये सहभागी झालेल्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य आणि शालेय विद्यार्थ्यांनी १० कातळ शिल्पांचा समूह पाहिला.
सायकल राईडच्या या उपक्रमासाठी आयआयटी एम प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाउंडेशन आयआयटी मद्रास द्वारा संचालित कोंकणातील कातळ शिल्प आणि वारसा संशोधन केंद्राचे सहकार्य लाभले. सकाळी ६.३० वाजता जयस्तंभ येथून सायकल राईडला सुरवात झाली. ही फेरी सागरी महामार्गाने भाट्ये, फणसोपमार्गे कोळंबे येथील कातळसड्यावर पोहोचली. तेथे कातळशिल्प शोधकर्ते सुधीर रिसबुड यांच्यासह कोकणातील कातळशिल्प व वारसा संशोधन केंद्राचे ऋत्विज आपटे, तार्किक खातू, गार्गी परुळेकर व अजिंक्य प्रभुदेसाई आणि अभ्यासक श्रीवल्लभ साठे उपस्थित होते.
त्यांनी कातळशिल्पांची माहिती दिली. यामध्ये क्लबच्या सायकलस्वारांसह कातळ शिल्प संशोधक, अभ्यासक यांनी सहभाग घेतला. कोळंबे येथील कातळ शिल्प समूह पाहून आपल्या प्राचीन वारशाचा खूप अभिमान वाटला. असा वारसा आपण सर्वांनी मिळून जपला पाहिजे याची जाणीव झाल्याचे सहभागींनी सांगितले. त्यानंतर सायकल चालवत पुन्हा रत्नागिरी शहरात राधाकृष्ण चित्रपट गृहाजवळ कोंकणातील कातळ शिल्प वारसा जतन केंद्राला भेट देऊन सायकलस्वारांनी माहिती घेतली.
या केंद्रात कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे वैज्ञानिक अन्वेषण, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्यावर काम करत आहे. रत्नागिरीमध्ये सुधीर रिसबूड, धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांच्यासह सहकारी प्रचंड मेहनत घेऊन हे काम गेली १४ वर्षे करत आहेत. जागतिक वारसा स्थळांमध्ये यातील कातळ शिल्पांचा समावेश होईल आणि त्यातून कोकणच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कातळाची निर्मिती, कातळशिल्पांची वापरलेली दगडी हत्यारे यासंबंधीची माहिती केंद्रात दिली असल्याचे त्यांनी सांगितले.




