
रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी दोन अर्ज दाखल
रत्नागिरी : नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. पहिले दोन दिवस एकही अर्ज दाखल झाला नव्हता; मात्र आज तिसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत दोन उमेदवारी अर्ज भरले गेले. प्रभाग तीन मधून मतीन याकुबसत्तार बावानी आणि याच प्रभागातून हिना मतीन बावानी यांनी सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
गेली तीन वर्ष प्रशासक राज राहिल्यानंतर जाहीर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे रत्नागिरीकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच प्रमुख लढत रंगण्याची शक्यता अधिक आहे; मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन तीन दिवस उलटले तरी महायुती आणि महाविकास आघाडीबाबत अधिकृत घोषणा न झाल्याने निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही बाजूने उमेदवारांची देखील नावे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आल्याने अनेकांची उत्सुकता शिगेला आहे.
दरम्यान नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू झाली. पहिले दोन दिवस एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र आज दुपारी हिना बावानी आणि मतीन बावानी यांनी प्रभाग तीन मधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदत असून अंतिम टप्प्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.




