
आंजणारी येथे अपघातांच्या मालिकेविरोधात २५ नोव्हेंबरला शिवसेना उबाठाचे रास्ता रोको आंदोलन
लांजा: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आंजणारी परिसरात वारंवार होणारे अपघात, त्याकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष व बेजबाबदारपणाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंजणारी येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असून या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील कित्येक वर्षांपासून दिरंगाई पद्धतीने सुरू असून सदर कामाबाबत मनमानीपणा, बेजबाबदारपणा दिसून येत असून कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. या निकृष्ट कामामुळे आंजणारी परिसरात सातत्याने अपघात होत असून मागील काही दिवसांत दिवसाआड अपघात झालेले असून मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान, जीवितहानी व प्रवाशांचे विनाकारण आर्थिक नुकसान झालेले आहे.
काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांना देखील येथील अपघातामुळे जीव गमावून बसावे लागले आहे. तथापि याबाबत संबंधित प्रशासनाकडून गांभीर्यपूर्वक दखल न घेता केवळ मनमानीपणे थातूर-मातूर पद्धतीने उपाययोजना केल्याचा आभास निर्माण केला जात आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये सुधारणा न होता अपघातांची मालिका सुरूच आहे.
तरी या प्रशासनाच्या मुजोर, गलथान व बेजबाबदार कार्यपद्धतीबाबत जाब विचारण्यासाठी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मौजे आंजणारी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक व उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस यांच्या उपस्थितीत रास्ता रोको तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून याद्वारे होणाऱ्या सर्व परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील याची राहील.
दरम्यान, तहसीलदार कार्यालयात निवेदन देताना शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख युवराज हांदे, शहरप्रमुख मोहन तोडकरी, माजी उपसभापती सुभाष रामाने, उपविभागीय प्रमुख शांताराम गुरव, अल्लाऊद्दीन नेवरेकर, बाबा धावणे, भालचंद्र लाड, अक्षय कुरुप, मंगेश लांजेकर, बाळकृष्ण गुजर, शाखाप्रमुख किरण बेर्डे, शिवाजी भालेकर, श्री पांचाळ आदी शिवसैनिक उपस्थित होते.




