
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील होमगार्ड जवान आकाश प्रमोद पालकर याने ’माऊंट फ्रेंडशिप’वर फडकविला तिरंगा
प्रतिकूल हवामान, गोठविणारी थंडी, धोकादायक ग्लेशियर आणि ५० ते ६० फुटांची सरळ आईस वॉल. अशा हिमालयातील अत्यंत कठीण आणि निसर्गाच्या खडतर आव्हानांवर मात करीत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील होमगार्ड जवान आकाश प्रमोद पालकर यांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता १७, ३५० फूट उंचीवरील ’माउंट फ्रेंडशिप’ हे शिखर यशस्वीरीत्या सर केले. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या अहोरात्र चालणार्या कर्तव्यनिष्ठ मैवाभावाला हिमालयाच्या भव्य उंचीवरून सलाम करण्यासाठी त्यांनी हे साहसी यश पोलीस दलाला समर्पित केले आहे.
हिमाचल प्रदेशातील मनाली येथून ३ ऑक्टोबर रोजी या मोहिमेचा प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी आकाश यांनी १२,७९५ फूट उंचीवरील लेडी लेग बेस कैम्प गाठला. तिथे दुसर्या दिवशी त्यांनी वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि पुढील आव्हानात्मक चढाईसाठी आवश्यक ते गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले. ५ ऑक्टोबरला १४,४३५ फूट उंचीवरील समिट कॅम्प गाठल्यानंतर त्याच मध्यरात्री १:३० वाजता अंतिम चढाईला सुरुवात झाली.
काळोखात, गोठवणार्या थंड हवेत ग्लेशियरमधून वाट काढीत त्यांनी पहिल्यांदा १५,९१२ फूट उंचीचा कोल पार केला. त्यानंतर समोर उभ्या असलेल्या ५०-६० फुटांच्या कठीण आईस वॉलवर त्यांनी आपल्या कौशल्याच्या आणि धैर्याच्या जोरावर यशस्वी मात केली. पुढील प्रवास १६,९९४ फूट उंचीवरील दुसर्या कोलवरून करत, प्रत्येक पाऊला अत्यंत सावधगिरीने टाकीत त्यांनी ६ ऑक्टोबरच्या सकाळी शिखरावर तिरंगा फडकविला.




