
प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास कक्ष डॉ. उदय सामंत यांचे निर्देश
महाराष्ट्राची अस्मिता आणि मायबोली मराठीचा प्रचार-प्रसार अधिक गतीने करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आता स्वतंत्र मराठी भाषा विकास कक्ष सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज सर्व जिल्हाधिकारी व अधिकार्यांसोबत घेतलेल्या दूरदृश्यप्रणाली बैठकीत यासंदर्भातील स्पष्ट निर्देश दिले.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासनाने आपल्या कार्यालयात किंवा परिसरात ५०० ते ६०० चौरस फुटांची जागा तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या कक्षाची संपूर्ण स्थापना, आकर्षक फर्निचर आणि इतर सोयी-सुविधांचा सर्व खर्च मराठी भाषा विभागामार्फतच केला जाणार असून, जिल्हा प्रशासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तिला शासकीय व्यवहारात १०० प्रभावीपणे लागू करणे आणि शासन व जनतेमधील संवाद अधिक दृढ करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.




