
खेडमध्ये २५ ऑक्टोबरला रिपब्लिकन पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा!
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे मार्गदर्शन; महायुतीतील प्रमुख नेत्यांना निमंत्रण
बाबाराम पवार यांची माहिती; कार्यकर्त्यांचा सन्मान, राजकीय प्रतिनिधित्व आणि आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीवर भर
खेड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता खेड येथील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात भव्य तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले या मेळाव्याला मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पक्षाचे खेड तालुकाध्यक्ष बाबाराम पवार यांनी दिली.
खेड तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि गावागावांत पक्षाचे संघटन मजबूत करणे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, त्यानंतर सांस्कृतिक केंद्रात मुख्य मेळावा पार पडणार आहे.
या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, चिपळूणचे आमदार शेखर निकम, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार अनिकेत तटकरे, गुहागरचे माजी आमदार विनय नातू आणि दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, अजय बिरवटकर, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, केदार साठे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे, खेड नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते रहीम सहीबोले, भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष संजय राव जाधव, ऋषिकेश मोरे, विनोद चाळके आणि पंचायत समिती सदस्य अपूर्वा जाधव यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.
पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे, कोकण प्रदेश सरचिटणीस सी. आर. कांबळे, कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत भाई सकपाळ, राज्य कार्यकारिणी सदस्य सुमित मोरे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रीतम रुक्के, जिल्हा संपर्कप्रमुख गौतम ल. तांबे, कोकण संघटक महेंद्र पवार आणि जिल्हा युवक अध्यक्ष प्रशितोघ कदम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे अध्यक्ष मंदार हळदे, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख राहुलभाई सोनावळे, मुंबई अध्यक्ष सेवा संघ दीपक हळदे, सेवा संघाचे उपाध्यक्ष वामन तांबे यांच्यासह गणेश शिर्के, अनिल पवार, रेश्मा नेवरेकर, स्वाती जाधव, सिद्धार्थ जाधव, राज हळदे, राजेंद्र तांबे, अपूर्वा पवार आणि मनोहर तांबे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावांत पक्षाच्या शाखा स्थापन करणे, युवक व महिला आघाडी सक्षम करणे आणि नव्या कार्यकर्त्यांना संघटनेत संधी देणे, या विषयांवर मेळाव्यात चर्चा होणार आहे. ‘गाव तिथे पक्षाची शाखा’ हे अभियान प्रभावीपणे राबविण्याबरोबरच स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याची दिशा निश्चित केली जाणार आहे.
बौद्धवाड्यांतील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, बुद्धविहारांचा विकास, विद्यार्थ्यांचे शिक्षण, बेरोजगार तरुणांचे प्रश्न आणि शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, या विषयांवरही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महायुतीतील घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मित्रपक्षांच्या उमेदवारांसाठी काम केले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य राजकीय प्रतिनिधित्व, सन्मान आणि निर्णयप्रक्रियेत संधी मिळावी, अशी अपेक्षा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पक्षाचे कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत भाई सकपाळ यांनी कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षाच्या स्वाभिमानाचा मुद्दा ठामपणे मांडला आहे. महायुतीमध्ये काम करताना रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली जावी, त्यांच्या त्यागाचा योग्य सन्मान व्हावा आणि पक्षाला राजकीय प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने योग्य संधी मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, पक्षाची संघटनात्मक भूमिका आणि आगामी राजकीय वाटचाल याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.




