राज्यात दहीहंडीचा जल्लोष; मुंबईत 168 गोविंदा जखमी


29 जण रुग्णालयात दाखल; महिला व बालगोविंदांचाही सहभाग


मुंबई : राज्यभर शनिवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबईत विविध ठिकाणी उंचच उंच मानवी मनोरे रचून गोविंदांनी दहीहंडी फोडण्याचा थरार अनुभवला. मात्र, या उत्सवात थर कोसळल्याने शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 168 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींपैकी 29 गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, 81 जणांवर उपचार सुरू होते. तसेच, उपचारानंतर 58 जखमींना घरी सोडण्यात आले. जखमींमध्ये तरुण गोविंदांसह महिला आणि काही लहान मुलांचाही समावेश आहे.

दुपारी 12.30 वाजेपर्यंत 22 गोविंदा जखमी झाल्याची नोंद होती. त्यापैकी 21 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते, तर एका गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, दुपारनंतर विविध ठिकाणी मानवी थर कोसळण्याच्या घटना घडत राहिल्याने रात्रीपर्यंत जखमींच्या संख्येत मोठी वाढ झाली.

मुंबईतील दादर, भायखळा, कुलाबा, माझगाव, गिरगाव, परळ, लालबाग, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, कांदिवली, अंधेरी, बोरिवली, मालाड आणि जोगेश्वरीसह विविध भागांत दहीहंडीच्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे विविध गोविंदा पथकांनी उत्साहात सहभागी होत उंच मानवी मनोरे रचले.

या उत्सवात तरुणांसह महिला गोविंदा, लहान मुले आणि काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला. दिव्यांग मुलांनीही दहीहंडी फोडून उत्साहाचा अनोखा संदेश दिला. मुंबईतील गल्लीबोळांपासून ते मोठ्या सार्वजनिक मैदानांपर्यंत सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला.

मोठ्या दहीहंडी उत्सवांमध्ये मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांची उपस्थिती, संगीत आणि आकर्षक बक्षिसांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र, उत्साहाच्या या जल्लोषाला काही ठिकाणी अपघाताचे गालबोट लागल्याने गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button