
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना व बस वाहतूकदार संघटनांची संयुक्त बैठक
रत्नागिरी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार १ सप्टेंबर रोजी येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना, बस वाहतूकदार संघटना यांच्यासोबत पोलीस व परिवहन विभाग यांची संयुक्त बैठक पार पाडली.
सर्व वाहनधारकांनी वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत याची खात्री करावी. सर्व रिक्षा धारकांनी त्यांची वाहने रिक्षा स्टँडवर शिस्तबद्ध पद्धतीने वाहतुकीची कोंडी होणार नाही अशाप्रकारे उभी करावीत. अवाजवी भाडे आकारणी करू नये, प्रवाशांशी उद्धट वर्तन करू नये, वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करू नये याबाबत त्यांना सूचित करण्यात आले. तसेच प्रवाशांच्या सोईसाठी जिल्ह्यातील रेल्वेस्थानके व मुख्य रिक्षा थांब्यावरती परिवहन विभागामार्फत ठरवून देण्यात आलेल्या रिक्षा भाडेदराचे फलक प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
बस वाहनधारकांनी बसमध्ये आपत्कालीन दरवाजा, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी सुस्थितीत असल्याचे सुनिश्चित करावे. चालक मद्यप्राशन करून व धोकादायक पध्दतीने बस चालविणार नाहीत याची खात्री संबंधित बस मालक यांनी करावी. तपासणीत दोषी आढळून आल्यास चालक व मालक या दोघांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सूचित करण्यात आले. तसेच वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी बसेसच्या सुटण्याच्या वेळेचे नियोजन बस मालकांनी करावयाचे आहे. बस मालकांनी प्रवाशांकडून अवाजवी भाड्याची मागणी करू नये, याबाबत त्यांना सूचित करण्यात आले आहे व त्यांना बस भाडेदर ठरवून देण्यात आले आहेत.
अवाजवी भाडे आकारणी तसेच प्रवाशांशी उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षा / बस वाहतुकदारांची तक्रार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा ईमेल आयडी dyrto.08-mh@gov.in यावर वाहनाच्या व प्रवासाच्या तपशिलासह करावी, असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.
गणेशोत्सवनिमित्त भाविक मोठ्या संख्येने कोकणात येत असतात. त्यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, मोटार वाहन निरीक्षक अरविंद फुलारी, पोलीस निरीक्षक (वाहतूक शाखा) प्रवीण रणदिवे, पोलीस निरीक्षक (महामार्ग पोलीस) दीपाली उदय जाधव, पोलीस निरीक्षक (जि.वि.शा.) अश्वनाथ खेडकर, उप पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा संजय कांबळे त्याचबरोबर रिक्षा व बस वाहतुकदार संघटनेचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.




