“मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही”; नितीन गडकरींची स्पष्ट भूमिका, म्हणाले—“मला लाज वाटते!”


१५ वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या महामार्गाच्या कामावर केंद्रीय मंत्री गडकरी संतापले; कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा


मुंबई-गोवा महामार्गाचे काम तब्बल १५ वर्षांहून अधिक काळ रखडले असून, अजूनही काही महत्त्वाची कामे अपूर्ण आहेत. महामार्गाचे काम ९३ ते ९४ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी पूल, बाह्यवळण मार्ग आणि इतर कामांमुळे कोकणच्या प्रवासाचा प्रश्न कायम आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या विलंबाबाबत तीव्र खेद व्यक्त केला आहे.

गोव्यातील पोरवोरिम सहापदरी उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाला झालेल्या विलंबाची कबुली दिली. “मुंबई-गोवा महामार्ग व्हायला उशीर झाला, ही माझ्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महामार्गाचे काम अनेक कंत्राटदारांमुळे रखडल्याचे सांगताना गडकरी यांनी संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाईचे संकेत दिले. “अनेक कंत्राटदार या कामात अपयशी ठरले आहेत. वर्षभरात सर्वाधिक कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करणे आणि अधिकाऱ्यांना निलंबित करणे, असा आठवा रेकॉर्ड करायचा आहे,” असे ते म्हणाले.

“उद्घाटनाला येणार नाही, मला लाज वाटते!”

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत गडकरी यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “येत्या काळात मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही. मला लाज वाटते की इतका उशीर झाला आहे,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महामार्गाच्या कामाबाबत नुकतीच बैठक झाल्याचे सांगत त्यांनी सद्यस्थितीही स्पष्ट केली. “मुंबई-गोवा महामार्ग ९३-९४ टक्के पूर्ण झाला आहे. ऑक्टोबरमध्ये मुंबई विमानतळावर उतरून गाडीने मुंबई-गोवा महामार्गाने गोव्याला जाणार आहे. महामार्ग व्यवस्थित झाला आहे की नाही, हे स्वतः पाहणार आहे,” असे गडकरी यांनी सांगितले.

२०११ पासून सुरू असलेला प्रवास अजूनही अपूर्ण

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाला २०११ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर इंदापूर ते झाराप या दुसऱ्या टप्प्याचे काम २०१४ मध्ये सुरू झाले. ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र भूसंपादन, पर्यावरणीय मंजुरी, कंत्राटदारांची निष्क्रियता आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पाला वारंवार विलंब झाला.

गणेशोत्सवाच्या प्रवासात अडथळ्यांची शक्यता

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी महामार्गाची सद्यस्थिती महत्त्वाची ठरणार आहे. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण मार्गांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. चिपळूण येथील उड्डाणपुलाचे कामही अपूर्ण आहे.

नागोठणे येथील नव्या पुलाला तडे गेल्याने हा पूल सध्या वाहतुकीसाठी बंद आहे. तात्पुरती दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी किमान एक मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी संरचना आणि सक्षमता चाचणीनंतरच वाहतूक सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम ९३-९४ टक्के पूर्ण झाल्याचा दावा असला, तरी प्रत्यक्ष प्रवासात महत्त्वाचे अडथळे कायम आहेत. आता ऑक्टोबरमध्ये गडकरी स्वतः या मार्गाने प्रवास करून पाहणी करणार असल्याने त्यांच्या पाहणीनंतर महामार्गाच्या कामाला किती वेग येतो, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button