पाचल-विद्यानगरमध्ये घरफोडी;गणपती सुट्टीत बंद घर फोडून शिक्षक दाम्पत्याचे साडेसहा लाखांचे दागिने लंपास


गणपती सुट्टीच्या कालावधीत शिक्षक दाम्पत्य मूळ गावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने पाचल-विद्यानगर येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी केली. घरातील लोखंडी व लाकडी कपाटे तसेच तिजोरी फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ५० हजार १८५ रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पाचल परिसरात खळबळ उडाली आहे.

पाचल येथील सरस्वती विद्या मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सन्नू पिरजादे व त्यांचे पती मुसाअल्ली गुलाब पिरजादे (५६) हे तुळसवडे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गणपती सुट्टीच्या निमित्ताने पिरजादे दाम्पत्य १२ सप्टेंबर रोजी मूळ गावी गेले होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पाचल-विद्यानगर येथील बंद घराला लक्ष्य केले.

चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा हत्याराच्या साहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी व लाकडी कपाटांचे दरवाजे तसेच तिजोरी फोडून त्यातील मौल्यवान ऐवज लंपास केला. पिरजादे दाम्पत्य घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे साडेचार तोळे सोन्याचे घडण, सोन्याचे ब्रेसलेट, डायमंड मंगळसूत्र, डायमंड कानातील टॉप्स, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे कानातले, सोन्याचा हार, कलर स्टोन्स नेकलेस, सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या पैंजणाचा जोड आणि १२ हजार रुपये रोख यांचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत ६ लाख ५० हजार १८५ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी फिंगरप्रिंट तज्ज्ञ, श्वानपथक तसेच फॉरेन्सिक पथकाची मदत घेण्यात आली.

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपती सुट्टीच्या काळात घर बंद असल्याची संधी साधून झालेल्या या घरफोडीमुळे पाचल परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी राजापूर पोलिसांकडून तपास सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button