
तीन दिवस समुद्रात भरकटलेली ‘धनलक्ष्मी’ नौका अखेर किनाऱ्यावर; आठ खलाशी सुखरूप
स्थानिक मच्छीमार व कार्यकर्त्यांच्या तत्पर मदतीमुळे मोठा अनर्थ टळला
रत्नागिरी : मुंबईहून मासेमारीसाठी समुद्रात गेलेली आणि इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने भरकटलेली ‘धनलक्ष्मी’ ही मासेमारी नौका अखेर रत्नागिरीत सुखरूप दाखल झाली. नौकेवरील आठ खलाशी सुरक्षित असून, स्थानिक मच्छीमार आणि कार्यकर्त्यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईची ‘धनलक्ष्मी’ ही नौका मासेमारीसाठी समुद्रात असताना तिच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे नौका समुद्रातच बंद पडली. संपर्क यंत्रणेतही अडचणी निर्माण झाल्याने नौका लाटांच्या तडाख्यात भरकटत रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात पोहोचली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून नौका समुद्रातच अडकून पडल्याने आठही खलाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
नौका मालक आणि खलाशांनी मदतीसाठी कोस्टगार्ड तसेच मत्स्य व्यवसाय विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मत्स्य विभागामार्फत मदतीचा संदेश स्थानिक मच्छीमारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित करण्यात आला.
संदेश मिळताच ‘कोकण संघटक’चे ताहीर मुल्ला यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांच्या सहकाऱ्यांसह स्थानिक मच्छीमारांनी रात्रभर शोध व मदत मोहीम राबवली. अखेर रविवारी सकाळी खलाशांना नौकेचे इंजिन पुन्हा सुरू करण्यात यश आले. त्यानंतर स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने ‘धनलक्ष्मी’ नौका रत्नागिरीतील मिरकरवाडा जेट्टीवर सुरक्षितपणे आणण्यात आली.
जेट्टीवर पोहोचल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी खलाशांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत त्यांना धीर दिला.
दरम्यान, तीन दिवस खलाशांचा जीव समुद्रात धोक्यात असताना तातडीने प्रत्यक्ष मदत पोहोचविण्याबाबत कोस्टगार्ड आणि मत्स्य विभागाच्या कार्यपद्धतीवर काही मच्छीमार संघटनांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
“तीन दिवस आठ खलाशांचा जीव समुद्रात धोक्यात होता. अशा परिस्थितीत तातडीने गस्त घालून मदतीसाठी पोहोचणे आवश्यक होते. मात्र, स्थानिक मच्छीमार आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच या आठही जणांचे प्राण वाचू शकले,” अशी प्रतिक्रिया सागर सम्राट मच्छीमार बचाव व संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जनाबभाई कारभारी यांनी दिली.



