कोकणच्या जैवविविधतेवर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे; निधीची कमतरता भासू देणार नाही


निसर्ग अभ्यासक्रमासाठी जिल्हा नियोजन व ‘सिंधुरत्न’मधून निधी देणार; सात्विणगावात निसर्ग माहिती केंद्राचे उद्घाटन


रत्नागिरी, दि. १२ : कोकणातील समृद्ध निसर्ग, जैवविविधता आणि स्थानिक वनसंपदेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात सखोल संशोधन करून कोकणच्या नैसर्गिक संपदेचे दस्तऐवजीकरण करावे. त्यासाठी संस्थांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केल्यास जिल्हा नियोजन समिती तसेच ‘सिंधुरत्न’ योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उद्योग तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

खेड तालुक्यातील सात्विणगाव येथे वन विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे उद्घाटन डॉ. सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण व फीत कापून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने वडपूजनाने झाली.

यावेळी माजी आमदार संजय कदम, विभागीय वन अधिकारी गिरजा देसाई, प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर दिवाले, शशिकांत चव्हाण यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

संशोधनातून पेटंट मिळविण्याचे आवाहन

कोकणातील एका विद्यार्थ्याने स्थानिक नाचणी पिकावर संशोधन करून पीएच.डी.सोबत पेटंट मिळवल्याचा दाखला देत डॉ. सामंत यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाची दिशा दिली.

“कोकणच्या निसर्गसंपदेवर उच्च दर्जाचे संशोधन करण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांसमोर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वनसंपदा, जैवविविधता आणि वन्यजीव यांचा शास्त्रीय अभ्यास करून त्यातून नवनवीन संशोधन पुढे यायला हवे,” असे त्यांनी सांगितले.

स्थानिक वनस्पती, औषधी वनस्पती, प्राणी-पक्षी, वन्यजीवांचे अधिवास, त्यांच्या हालचाली आणि कोकणातील जैवविविधतेतील बदल यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

‘निसर्ग माहिती केंद्र’ संशोधनाचे दालन व्हावे

सात्विणगावातील निसर्ग माहिती केंद्र हे केवळ पर्यटकांसाठी माहिती देणारे केंद्र न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निसर्गाचा अभ्यास करता येईल आणि संशोधनाला चालना मिळेल असे केंद्र बनावे, अशी अपेक्षा डॉ. सामंत यांनी व्यक्त केली.

सह्याद्रीच्या खोऱ्यात आढळणारे पट्टेरी वाघ, बिबट्या, ब्लॅक पँथर यांसारखे वन्यजीव, त्यांची भ्रमणक्षमता, अधिवास आणि त्यांच्या अस्तित्वामागील शास्त्रीय कारणांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्ग आणि जैवविविधतेचे महत्त्व समजेल, असेही त्यांनी नमूद केले.

वन विभागाच्या कामाचे कौतुक

निसर्ग माहिती केंद्राची उभारणी केल्याबद्दल डॉ. सामंत यांनी विभागीय वन अधिकारी गिरजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड आणि संपूर्ण वन विभागाच्या टीमचे विशेष कौतुक केले.

“या केंद्रामुळे नागरिक आणि पर्यटकांना कोकणच्या जैवविविधतेची माहिती मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना संशोधनासाठी एक उपयुक्त व्यासपीठ उपलब्ध होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय वन अधिकारी गिरजा देसाई यांनी केले, तर सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button