
️सुपर टायफून ॲक्टिव्ह, भारतात मान्सूनचा खेळ बिघडणार; वादळाचा स्पीड 162 किलोमीटर, 600 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस!
Super Typhoon Dolphin : पश्चिम प्रशांत महासागरात निर्माण झालेले शक्तिशाली सुपर चक्रीवादळ ‘डॉल्फिन’ सध्या अत्यंत तीव्र वेगाने पुढे सरकत आहे. या चक्रीवादळामुळे जपान, चीन आणि तैवान या देशांची चिंता कमालीची वाढली आहे.
ताशी अत्यंत वेगवान वारे, मुसळधार पाऊस आणि समुद्रातील धोकादायक लाटांमुळे या संपूर्ण प्रदेशात जनजीवन विस्कळीत झाले आहे. जपानच्या नैऋत्येकडील ओकिनावा प्रदेशात या चक्रीवादळाचा फटका आधीच बसला असून तेथे सुमारे 14 हजार इमारतींचा वीजपुरवठा खंडित झाला आहे आणि 5 जण जखमी झाले आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळात ताशी 162 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, वाऱ्याच्या झोताचा वेग ताशी 216 किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. सध्या हे डॉल्फिन चक्रीवादळ चीनच्या पूर्व किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक बंदरे बंद करण्यात आली असून शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि अनेक भागांतील शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. एकट्या शांघायमध्ये 1300 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत तर चीनने सुमारे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
डॉल्फिन चक्रीवादळाचे अपडेट्स
ओकिनावामध्ये 5 जण जखमी: तीव्र वाऱ्यांमुळे ओकिनावामध्ये पाच ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे लोक खाली पडले, मात्र सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
14 हजार इमारतींचा वीजपुरवठा खंडित: चक्रीवादळाच्या तीव्र वाऱ्यांमुळे ओकिनावामधील वीज वितरण व्यवस्थेला मोठा फटका बसला असून, सुमारे 14 हजार घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
चीनच्या पूर्व किनारपट्टीला मोठा धोका :
डॉल्फिन चक्रीवादळ चीनच्या झेजियांग आणि फुजियान प्रांतांच्या दरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन चीनने आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी वेगाने सुरू केली आहे.
Heavy flooding caused by Typhoon Dolphin in Shanghai, China 🇨🇳 (09.08.2026) pic.twitter.com/B8Ef5SS6ki
— Disaster News (@Top_Disaster) August 9, 2026
बंदरांमधील कामकाज बंद: झेजियांग प्रांतात चक्रीवादळाचा इशारा सर्वोच्च पातळीवर वाढवण्यात आला असून, अनेक बंदरांचे कामकाज पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. याचा मोठा फटका सागरी व्यापाराला बसण्याची शक्यता आहे.
162 फेरी मार्ग स्थगित: झेजियांगमधील प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे सुमारे 162 फेरी (होडी) मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित करण्यात आले आहेत.
शाळा आणि सागरी उपक्रमांवर बंदी: निंगबो शहरात शाळा आणि इतर शैक्षणिक उपक्रम बंद ठेवण्यात आले आहेत. याशिवाय पाण्याशी संबंधित सर्व उपक्रम आणि पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे.
विमान वाहतुकीला मोठा फटका: चक्रीवादळामुळे जपान, चीन आणि तैवानमध्ये शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. निंगबो विमानतळावरील उड्डाणे स्थगित करण्यात आली असून, तैवानने 63 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत.
600 मिमीपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता: पूर्व झेजियांगच्या काही भागात 600 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढ्या प्रचंड पावसामुळे भीषण पूर आणि भूस्खलनाचा (डोंगर खचण्याचा) धोका वाढला आहे.
चीनच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा: डॉल्फिनमुळे पूर्व चीनमध्ये पुढील काही दिवस तीव्र वारे आणि मुसळधार पावसाचा जोर कायम राहील असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे वाहतूक आणि सामान्य जनजीवन प्रभावित झाले आहे.
तैवान सामुद्रधुनीत तणाव: चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चीनने तैवान सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना आपल्या ट्रॅफिक-कंट्रोल सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तैवानने चीनच्या या आदेशावर कडक टीका केली आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा परिणाम नैसर्गिक आपत्तीसोबतच प्रादेशिक राजकीय तणावाच्या रूपातही पाहायला मिळत आहे.
भारतावर याचा काय परिणाम होऊ शकतो?
सुपर चक्रीवादळ ‘डॉल्फिन’चा थेट धोका भारताला नसला तरी भारतीय मान्सूनच्या प्रणालीवर याचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. हवामान तज्ज्ञांच्या मते पश्चिम प्रशांत महासागरात निर्माण झालेले एवढे शक्तिशाली चक्रीवादळ मोठ्या प्रमाणावर उष्णता आणि बाष्प (नमी) स्वतःकडे खेचून घेते.
यामुळे बंगालच्या उपसागरात आणि भारतात पाऊस पाडण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या हवामान प्रणालींमधील बाष्पाचे प्रमाण कमी होऊ शकते. परिणामी, मध्य आणि उत्तर भारताच्या काही भागात मान्सूनचा पाऊस काही काळासाठी मंदावू शकतो आणि काही दिवस पावसाचा खंड (Dry Spell) पाहायला मिळू शकतो. मात्र याचा अर्थ असा नाही की भारतातील मान्सून संपेल. डॉल्फिन चक्रीवादळ कमकुवत झाल्यावर किंवा पुढे निघून गेल्यानंतर भारतातील मान्सूनचा जोर पुन्हा पूर्ववत होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.




