लोटे एमआयडीसीच्या दुरवस्थेवर आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात


‘मुख्यमंत्र्यांनी एक दिवस एमआयडीसीतून चालून दाखवावे’; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरही जोरदार टीका


चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीतील रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून शिवसेना नेते तथा युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. लोटे एमआयडीसीतील रस्त्यांची अवस्था पाहता आपण औद्योगिक वसाहतीत आहोत की कन्स्ट्रक्शन साइटवर, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्योगमंत्री आणि पालकमंत्री याच जिल्ह्यातील असताना एमआयडीसीची अशी अवस्था असेल, तर राज्यातील इतर औद्योगिक वसाहतींची स्थिती काय असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीसह काही उद्योग बाहेर जाण्याच्या मार्गावर असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. अनेक उद्योजकांनी आपल्याशी संवाद साधून समस्या मांडल्या आहेत. मात्र, दबावामुळे त्या उघडपणे मांडता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजकांच्या प्रश्नांसाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे आश्वासन देत स्थानिक नागरिक आणि उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

पाण्याच्या प्रश्नावरही सरकारला धारेवर

लोटे एमआयडीसीतील पाण्याच्या प्रश्नावरही आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले. समुद्र अगदी जवळ असतानाही उद्योगांना पाण्यासाठी पावसावर अवलंबून राहावे लागत असेल, तर ही गंभीर बाब आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीच्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीतून एक दिवस चालून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.

महाराष्ट्रातील उद्योजकांचा अद्याप राज्यावर विश्वास आहे; मात्र सरकारने या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नये, असेही त्यांनी सुनावले. प्रदूषणाच्या प्रश्नामुळे कोकणात नवीन प्रकल्पांना विरोध होतो. ही वस्तुस्थिती सरकारने समजून घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्गावरही निशाणा

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावरूनही ठाकरे यांनी सरकार आणि संबंधित यंत्रणांवर टीका केली. गेल्या दहा-बारा वर्षांपासून महामार्ग पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांच्या पाठी-कमरेची अवस्था खराब झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

दहा दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या पुलाची अवस्था खराब झाल्याने तो बंद करण्याची वेळ आल्याचा दावा त्यांनी केला. महामार्गावर सलग ५० मीटरचा चांगला रस्ता शोधूनही सापडत नाही, असे ते म्हणाले. आमदार किंवा मंत्र्यांचा दौरा असला की ठेकेदारांकडून रस्त्यांची डागडुजी केली जाते. आपल्या दौऱ्यापूर्वीही अशीच डागडुजी करण्यात आली; मात्र सकाळच्या पावसाने तिची पोलखोल केली, असा आरोप त्यांनी केला.

‘सरकारला जाग आली नाही तर आंदोलन’

“आम्हाला कोणतेही राजकीय विषय घ्यायचे नाहीत. माध्यमांच्या माध्यमातून हे प्रश्न सरकारसमोर मांडत आहोत. सरकारला जाग येते का ते पाहू; अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल,” असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवस वेळ काढून आपल्यासोबत मुंबई-गोवा महामार्ग आणि लोटे एमआयडीसीची पाहणी करावी, असे आव्हानही त्यांनी दिले. चाकण एमआयडीसीच्या प्रश्नांवर आपण भेट दिल्यानंतर उद्योगमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धावपळ करावी लागली होती. त्याच गांभीर्याने लोटे एमआयडीसीच्या प्रश्नांकडेही सरकारने पाहावे, अशी मागणी त्यांनी केली.

“मला नेतृत्व करायचे नाही; मात्र जनतेसोबत मी कायम आहे,” अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button