राजापूर अर्बन बँकेला पुन्हा एकदा नाहक बदनाम करण्याचा डावसदनिकाधारकांना नियमाप्रमाणेच कर्जपुरवठा; थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीर कारवाई सुरू.

राजापूर : राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रत्नागिरी शाखेकडून काही सदनिकाधारकांना करण्यात आलेला कर्जपुरवठा हा बँकेच्या नियमांनुसार आणि कर्ज वितरण प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात आला आहे. संबंधित कर्जदारांकडून गेल्या काही वर्षांपासून कर्जाची परतफेड सुरू होती. मात्र, कर्जाचे हप्ते थकल्यानंतर बँकेने नियमानुसार वसुलीची कारवाई सुरू केली आहे. असे असताना काही मंडळींकडून उपोषण व सोशल मीडियाच्या माध्यमातून बँकेची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न होत असून, हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. बँकेची बदनामी करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राजापूर अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत गणपत सुतार यांनी दिला आहे.
गतवर्षापासून काही मंडळी राजापूर अर्बन बँकेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही कर्जप्रकरणांमध्ये बँकेकडून किंवा तत्कालीन शाखाधिकाऱ्यांकडून झालेल्या त्रुटींची बँकेने गंभीर दखल घेत कारवाई केली आहे. संबंधित कर्जप्रकरणांमध्ये वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सभासदांनी बँकेवर दाखविलेला विश्वास आणि बँकेच्या प्रगतीसाठी दिलेली साथ यामुळे मागील वर्षभरात बँकेने चांगली कामगिरी करत आपली विश्वासार्हता कायम राखली आहे, असेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी येथे स्वातंत्र्यदिनी काही कर्जदारांनी बँकेच्या विरोधात उपोषण केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून, त्यातील काही मुलाखती सोशल मीडियावरही प्रसिद्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बँकेची भूमिका स्पष्ट करताना अॅड. सुतार म्हणाले की, संबंधित कर्जदारांनी एका बिल्डरकडून सदनिका घेण्यासाठी साठेखत केले होते. त्यापैकी दोघांनी बिल्डरसोबत, तर एका कर्जदाराने जागामालक आणि बिल्डर यांच्यासोबत साठेखत केले होते.
त्यानंतर २०२० मध्ये संबंधितांनी बँकेशी संपर्क साधून कर्जाची मागणी केली. बँकेने आवश्यक कायदेशीर बाबी तपासून तसेच बँकेच्या कायदेतज्ज्ञांकडून सर्च रिपोर्ट प्राप्त करून कर्जप्रकरणांची प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यानंतर कर्जपुरवठा केला. साठेखतात नमूद केलेल्या अटींनुसार बांधकामातील चौथ्या मजल्याचा स्लॅब पडल्यानंतर कर्जपुरवठ्याची पुढील रक्कम देण्याची तरतूद होती. त्यानुसार बँकेने कर्जपुरवठा केल्याचा दावा अॅड. सुतार यांनी केला.
संबंधित कर्जदारांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत आपल्या कर्जखात्यात नियमितपणे हप्ते भरले. मात्र, त्यानंतर कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने त्यांना नोटिसा बजावून नियमानुसार वसुलीची कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, संबंधित बिल्डर फरार असून त्यानेही बँकेकडून कर्ज घेतलेले आहे. त्यामुळे त्याच्याविरोधातही कर्जवसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे अॅड. सुतार यांनी सांगितले.
नियमाप्रमाणे कर्जपुरवठा करण्यात आला आणि संबंधित कर्जदारांनी अनेक वर्षे त्याची परतफेडही केली. मात्र, कर्जाचे हप्ते थकल्यानंतर आता बँकेने आपली फसवणूक केल्याचा आरोप केला जात असल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. बँकेची नाहक बदनामी करण्याचा हा प्रकार असून, अशा प्रकारांना बँक खपवून घेणार नाही. कर्जदार कोणीही असो आणि कितीही मोठा असो, थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँक नियमानुसार कठोर कारवाई करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बँकेची बदनामी करण्यामागे कोणाचा हात आहे, याची माहिती बँकेला असल्याचा दावाही त्यांनी केला. बँकेची बदनामी करणाऱ्यांसह अशा प्रकारांना प्रवृत्त करणाऱ्यांविरोधातही आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
राजापूर अर्बन बँकेला शंभर वर्षांची परंपरा असून, सभासदांचा बँकेवर दृढ विश्वास आहे. याच विश्वासाच्या बळावर बँकेने आजवर प्रगती साधली असून, भविष्यातही बँकेची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. सभासदांचा विश्वास जपणे हे बँकेचे कर्तव्य असून, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे अॅड. सुतार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button