
रत्नागिरी मध्यवर्ती बँक निवडणुकीत उमेदवारीवरून संभ्रम करण्याचा प्रयत्न; ‘फिक्स’ उमेदवारीच्या दाव्यांवर शिवसेनेचा इशारा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (RDC) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही इच्छुकांकडून ‘माझी उमेदवारी निश्चित झाली आहे’, ‘उमेदवारी मलाच मिळणार’ अशा स्वरूपाचे दावे केले जात असल्याने पदाधिकारी, सभासद आणि संभाव्य मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्यासह रत्नागिरीचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी, बाबू म्हाप, संगमेश्वरचे तालुकाप्रमुख प्रमोद पवार, लांजाचे तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई आणि राजापूरचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार पालकमंत्री तथा उद्योग व मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे आहे. त्यामुळे कोणत्याही इच्छुक व्यक्तीकडून उमेदवारीबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांवर पदाधिकारी, सभासद आणि संभाव्य मतदारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारीबाबत चुकीची माहिती देऊन कोणाचीही दिशाभूल होऊ नये, यासाठी हे स्पष्टीकरण देण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी बँक निवडणुकीत उमेदवारीचा निर्णय कोणाच्या बाजूने होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




