कशेडी बोगद्यातील पाण्याची गळती कायम; उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह


गणेशोत्सवात वाढणाऱ्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका; वाहनचालकांकडून कायमस्वरूपी उपायांची मागणी


: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यातील पाण्याची गळती अद्याप सुरूच असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपाययोजनांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गळती रोखण्यासाठी केमिकल ग्राऊंटिंग, वॉटरप्रूफिंग, ड्रेनेजसह विविध तांत्रिक उपाय करण्यात आले असतानाही पावसाळ्यात बोगद्याच्या छतासह भिंतींमधून पाणी झिरपत आहे. परिणामी रस्ता निसरडा होत असून वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत कशेडी बोगद्यातील गळतीचा प्रश्न कायम राहिल्यास अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

बोगद्याच्या छतावरून आणि भिंतींमधून झिरपणाऱ्या पाण्याचा काही ठिकाणी रस्त्यावर साचत असल्याने वाहनांच्या टायरची पकड कमी होते. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे.

कोट्यवधींच्या उपायांनंतरही गळती कायम

गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित कंत्राटदाराने आयआयटी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बोगद्याचे सर्वेक्षण केले. खडकांमधील भेगांमधून येणारे पाणी रोखण्यासाठी केमिकल ग्राऊंटिंग करण्यात आले. तसेच ड्रेनेज व पन्हाळी व्यवस्था, वॉटरप्रूफिंग, पीव्हीसी मेम्ब्रेन, फायबर शीट आणि शॉटक्रिट यांसारख्या उपाययोजनाही करण्यात आल्या. मात्र, या सर्व उपायांनंतरही पाण्याची गळती सुरूच असल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘मलमपट्टी नको, कायमस्वरूपी उपाय हवा’

बोगद्यातील गळतीमुळे आतापर्यंत अनेक दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाल्याचा दावा वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. यामध्ये दोन दुचाकीस्वारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी गळतीचे मूळ कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

“कशेडी बोगद्यात पाण्याची गळती सुरूच असल्याने दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. बोगदा सुरू झाल्यापासून अनेक अपघात झाले असून दोन दुचाकीस्वारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे गळतीवर तातडीने कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचे आहे,” अशी प्रतिक्रिया वाहनचालक संदीप शिरावले यांनी दिली.

गणेशोत्सवात महामार्गावर होणारी वाढीव वाहतूक लक्षात घेता बोगद्यातील गळती तातडीने थांबवावी, रस्त्यावरील निसरडेपणा दूर करावा आणि वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

दृष्टिक्षेपात कशेडी बोगदा

  • प्रकल्प खर्च : सुमारे ५०२ कोटी रुपये
  • बोगद्याची लांबी : सुमारे २ किलोमीटर
  • बोगदे : दोन समांतर बोगदे
  • रुंदी : १४ मीटर
  • उंची : ८ मीटर
  • जोडरस्ते : सुमारे ७ किलोमीटर
  • संपूर्ण प्रकल्पाची लांबी : सुमारे ९ किलोमीटर

गळती रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना

  • आयआयटी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण
  • केमिकल ग्राऊंटिंग
  • ड्रेनेज व पन्हाळी व्यवस्था
  • वॉटरप्रूफिंग
  • पीव्हीसी मेम्ब्रेन व फायबर शीट
  • शॉटक्रिटचे अस्तर

मात्र, या उपाययोजनांनंतरही गळती थांबत नसल्याने “कोट्यवधी रुपये खर्च करूनही गळती थांबत नसेल, तर कायमस्वरूपी उपाय कधी होणार?” असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button