“पुणे म्हणजे प्रेम”; राहुल गांधींनी शेवटी मराठीत बोलून जिंकलं पुणेकरांचं मन; दिला ‘हा’ खास संदेश!


लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम आज (२२ ऑगस्ट) पुण्यात पार पडला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी ‘जेन झी’शी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातून पुण्यात विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनींनी या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी राहुल गांधी यांनी ‘जेन झी’शी संवाद साधत ‘महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे’ असं भाष्य केलं.

‘मनुस्मृतीने महिलांना तीन चौकटीत बसवलं, महिला स्वतंत्र राहू नये हा मनस्मृतीचा डाव असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी काही विद्यार्थिंनीबरोबर संवाद साधला. यावेळी अनेक विद्यार्थीनींनी व्यासपीठावर जाऊन राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत त्यांना आलेल्या समस्या सांगत व्यथा मांडल्या आहेत. काही विद्यार्थीनींनी त्यांना आलेले वाईट अनुभव देखील सांगितले.

राहुल गांधींचं शेवटी मराठीत भाष्य

दरम्यान, राहुल गांधी यांनी पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या शेवटी मराठीत एक वाक्य बोलत पुणेकरांचं आणि ‘जेन झी’चं मन जिंकलं आहे. पुण्यासाठी खास संदेश काय द्याल? असा प्रश्न कार्यक्रमातील निवेदकाने राहुल गांधी यांना विचारला.

यावर राहुल गांधी यांनी मराठीत बोलत अगदी दोन शब्दांत खास संदेश दिला. “पुणे म्हणजे प्रेम”, असं राहुल गांधी यांनी मराठीतून म्हटलं. त्यांच्या या शब्दानंतर ‘जेन झी’नी मोठा जल्लोष केला. यानंतर सर्व विद्यार्थीनींनी देखील “पुणे म्हणजे प्रेम”, असं म्हणत जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं आहे.

‘महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद’ : राहुल गांधी

“मला अनेकदा विचारलं जातं की भारताची ताकद काय आहे? हा प्रश्न विचारल्यावर अनेक उत्तरे मिळतात. कोणी म्हणतं की आपली अर्थव्यवस्था, कोणी म्हणतं की आपलं सैन्य, कोणी म्हणतं की आपली आरोग्य व्यवस्था, तर कोणी कदाचित आपली लोकसंख्या असंही म्हणतं. पण भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे याबद्दल माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. ७० कोटी भारतीय महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. महिला शक्ती हीच देशाची ताकद आहे”, असं राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

‘मनुस्मृतीने महिलांना तीन चौकटीत बसवलं’ : राहुल गांधी

“महिला या पुरुषांच्या तुलनेत स्वभावात अधिक संवेदनशील असतात. माझा ठाम विश्वास आहे की, भारतातील महिला हीच देशाची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा मी पुरुषांशी बोलतो, तेव्हा महिला प्रामुख्याने तीन चौकटींमध्ये पाहिलं जातं. मुलगी, पत्नी किंवा आई म्हणून पाहिलं जातं. पत्नी, मुलगी किंवा आई म्हणून ओळखलं जाण्यात काही गैर नाही. मात्र, फक्त मुलगी, पत्नी किंवा आई एवढीच महिलांची ओळख असू शकत नाही”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच मनुस्मृतीने महिलांना तीन चौकटीत बसवलं. महिला स्वतंत्र नाही असा मनुस्मृतीचा विचार आहे. महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनस्मृतीचा डाव आहे”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button