
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून शिक्षकाची साडेसहा लाखांची ऑनलाइन फसवणूक
रत्नागिरी, दि. ६ : गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगून एका भामट्याने रत्नागिरीतील शिक्षकाची तब्बल ₹६ लाख ४८ हजार ६१२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील सिद्धीविनायक नगर येथे राहणारे शिक्षक रमेश विश्राम खापरे (वय ५४) यांना ४ ऑगस्ट रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख महानगर गॅस एजन्सीचा प्रतिनिधी म्हणून करून देत, गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर व्हॉट्सॲपवर ‘Mahanagar Gas Bill Update’ नावाची अॅप फाईल पाठवून ती इन्स्टॉल करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर डेबिट कार्डची माहिती भरायला लावून सायबर भामट्याने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने ₹६ लाख ४८ हजार ६१२ इतकी रक्कम परस्पर वळती करून घेतली.
फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर खापरे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.




